नवी दिल्ली – डेक्सट्रोमेथोर्फेन हे कफ सिरप लहान मुलांना देऊ नये, अशा सूचना केंद्रीय आरोग्य सेवा संचालनालयाने दिल्ली सरकारच्या आरोग्य सेवा संचालनायाला केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालकांनी ७ डिसेंबरला दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाला पत्र लिहून या सूचना केल्या आहेत. जनतेचे हित लक्षात घेऊन एका कंपनीने तयार केलेले डेक्सट्रोमेथोर्फेन औषध वापरू नये तसेच हे औषध चलनातून परत घ्यावे, अशा सूचना केल्या आहेत.
लहान मुलांना दिल्या जाणार्या या कफ सिरपमुळे विषबाधा होऊन १६ मुलांची प्रकृती बिघडली होती. तर तीन मुलांचा मृत्यू झाला होता. या मुलांना मोहल्ला क्लिनिकमध्ये एका कंपनीने तयार केलेले डेक्सट्रोमेथोर्फेन औषध देण्यात आले होते. चार वर्षांहून कमी वयाच्या मुलांना हे औषध दिले जाऊ नये, या आशयाच्या नोटिसा दिल्लीच्या आरोग्य विभागाने आपल्या अधिकार क्षेत्रातील सर्व मोहल्ला क्लिनिक आणि दवाखान्यांना पाठवाव्यात, अशा सूचनाही आरोग्य सेवा महासंचालकांनी आपल्या पत्रात केल्या आहेत.
विषबाधेनंतर केंद्रीय औषधे निकष नियंत्रण संस्थेकडून औषधाची चाचणी करण्यात आली. चाचणीनंतर त्याचा अहवाल दिल्लीच्या आरोग्य विभागाला पाठविण्यात आला. कलावती सरन रुग्णालयाच्या एका डॉक्टरांनी सांगितले, की या वर्षी जुलै महिन्यात मोहल्ला क्लिनिकमधून उल्टी, ताप आणि अतिसाराचे रुग्ण रुग्णालयातील आपत्कालीन विभागात आले होते. दररोज मुले आजारी पडून रुग्णालयात येत असल्यामुळे सगळेच हैराण झाले होते. यादरम्यान तीन मुलांचा मृत्यू झाला होता. तर १६ मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्दी, खोकल्यावर देण्यात आलेल्या डेक्सट्रोमेथोर्फेनने विषबाधा होऊन मुलांना रुग्णालयात आणण्यात आले होते. मुलांना वाचविण्यासाठी नंतर नेलोक्सेन औषध देण्यात आले होते.
“डेक्सट्रोमेथोर्फेन हे औषध खोकल्यावर परिणामकारक मानले जाते. खोकल्याच्या औषधात डेक्सट्रोमेथोर्फेन असते. अनेक वेळा ते अॅलर्जी विरोधी औषधांसोबत दिल्यास दुष्परिणाम दिसून येतात. सहा वर्षांहून कमी वयाच्या मुलांना हे औषध अजिबात देऊ नये.”
– प्रा. योगेंद्र कुमार गुप्ता, माजी अध्यक्ष, भारतीय फार्मकोलॉजिकल सोसायटी आणि माजी अध्यक्ष, फॉर्मकोलॉजी विभाग, एम्स