नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या पहिल्या चक्री वादळामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पुढील २४ तासांत हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, स्कायमेट वेदर या खाजगी एजन्सीनेही हवामानाचा अंदाज व्यक्त केला असून, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या हवामान बुलेटिनमध्ये असे म्हटले आहे की, आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र १९ मार्च रोजी तीव्र होण्याची शक्यता आहे. हळूहळू बांगलादेश आणि उत्तर म्यानमारच्या किनारपट्टीकडेही हा पट्टा तीव्र होणार आहे. यामुळे पूर्व किनारपट्टी भागात पाऊस पडणार नाही परंतु अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो. या चक्री वादळाचे नाव असनी असे ठेवण्यात आले असून ते श्रीलंकेने सुचवले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांवर मासेमारी, पर्यटन आणि शिपिंग क्रियाकलापांवर तत्काळ बंदी घातली आहे. त्याचबरोबर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लष्कर, नौदल आणि हवाई दलाला स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक बैठक झाली ज्यामध्ये चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीची माहिती घेण्यात आली.
केंद्रीय गृहसचिवांनी केंद्रीय यंत्रणांना या वादळावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच यंत्रणांना अंदमान आणि निकोबार प्रशासनाच्या संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याच वेळी, एनडीआरएफची एक टीम आधीच पोर्ट ब्लेअरमध्ये तैनात करण्यात आली आहे. एनडीआरएफची अतिरिक्त टीम गरज पडल्यास बाधित भागातही पाठवली जाऊ शकते. मच्छिमारांना प्रशासनाकडून अंदमान समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने सांगितलेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी उत्तराखंडमध्ये तुरळक गारपीट होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पुढील पाच दिवसांत विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. एवढेच नाही तर रायलसीमा आणि उत्तर कर्नाटकातील काही भागात २० ते २२ तारखेदरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, २१ आणि २२ मार्च रोजी किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात रिमझिम पाऊस पडेल, असेही सांगण्यात आले आहे.