नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षात देशभरात सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर क्राईम साठी अनेक कायदे करण्यात आले तरी गुन्हे घटलेले नाहीत. या गुन्ह्यांची दखल घेत विशेष सायबर पोलिस स्टेशन स्थापन करण्यात आले आहेत. मात्र, सायबर गुन्ह्यांचा तपासही संथ गतीने होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे फसवणूक झालेले अद्यापही चिंताग्रस्त आहेत.
सायबर गुन्हेगार ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब असतात.गेल्या पाच वर्षांपासून ऑनलाइन पेमेंट आणि बँकिंग व्यवहार वाढले असून यासाठी नवनवीन ॲप निर्माण होत आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीमुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने केंद्र सरकारने याबाबत चिंता व्यक्त करीत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
देशात कॅशबॅकच्या नावाखाली सायबर फसवणूकी बद्दल सरकारने सतर्क केले आहे. गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक ट्विटर हँडल सायबर फ्रेंड सांगतो की, यूपीआय अॅपद्वारे पेमेंट ऑफर करणा-या डिस्काउंट कूपन, कॅशबॅक आणि फेस्टिव्हल कूपनशी संबंधित सोशल मीडियावरील सर्व फसव्या आकर्षक जाहिरातींपासून सावध राहण्याची गरज आहे.
अनेक भामटे व घोटाळेबाज देखील बिनदिक्कतपणे व्हॉट्सअॅप वापरतात. त्यामाध्यमातून फसवणूकही करतात.
देशात २०२१मध्ये सायबर गुन्ह्याची ५२,९७४ प्रकरणे दाखल झाली आहेत. २०२०च्या (५०,०३५ प्रकरणे) तुलनेत ती पाच टक्के अधिक आहेत. तर, २०१९च्या (४४,७३५ प्रकरणे) तुलनेत जवळपास १५ टक्के अधिक आहेत. सरकारी आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या भारतातील गुन्हे २०२१ अहवालानुसार सायबर गुन्ह्यातील ७०%पेक्षा अधिक प्रकरणे तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आसाममधील आहेत.
देशात २०२१मध्ये सायबर दहशतवादाची एकूण १५ प्रकरणे दाखल करण्यात आली. यातील झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी तीन आणि कर्नाटक, केरळ, मेघालय, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक प्रकरण दाखल करण्यात आले आहे. सायबर गुन्ह्यांचा दर तेलंगणात सर्वाधिक २७ होता. त्यानंतर आसाम १३.८, कर्नाटक १२.१, उत्तराखंड ६.३, महाराष्ट्र ४.५ यांचा क्रमांक आहे. दिल्लीत अशा गुन्ह्यांचा दर १.७ होता. गृह मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या एनसीआरबीने सांगितले की, २०२१मध्ये देशात सायबर गुन्ह्यांची संख्या ही प्रति एक लाख लोकसंख्येवर सरासरी ३.९ अशी नोंदली गेली आहे. त्यामुळे सर्व काही आपल्या बाबतीत घडून येण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
Alert Cyber Crime Investigation National Figure