नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुगलवर सर्व काही सहज सापडते म्हणून केव्हाही, कुठेही आणि काहीही शोधण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. मात्र, त्याद्वारे तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. यासंदर्भात पोलिस आणि सायबर शाखा वारंवार आवाहान करीत असले तरी त्याचा काहीच परिणाम होत नाही. नाशिकमध्ये अशाच पद्धतीने एका ज्येष्ठ नागरिकास सुमारे १ लाख रुपयांना गंडविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वामन नामदेव गायकवाड (वय ६३, रा. गायकवाड बंगला, राजमाता जिजाऊ मार्ग, तिडके कॉलनी) यांनी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, गायकवाड यांना काही पार्सल कुरिअरद्वारे पाठवायचे होते. त्यामुळे त्यांना कुरिअर कंपनीचा संपर्क क्रमांक हवा होता. त्यांनी तातडीने हा क्रमांक गुगलवर शोधला. तेथे क्रमांक मिळाल्यानंतर काही वेळातच त्यांनी ९९४०५७००५१ या क्रमांकावर कॉल केला. गायकवाड यांनी कुरिअर बाबत विचारणा केली असता संबंधित व्यक्तीने फोनवरच सांगितले की, ‘आमचे कर्मचारी दिलेल्या पत्त्यावर कुरिअर घेऊन गेले होते. परंतु घर बंद असल्याने कुरिअर देणे शक्य झाले नाी. त्यामुळे तुम्हाला कुरिअर पुन्हा पाठवायचे असेल तर त्यासाठी १५ रुपये अधिक चार्ज लागेल’, असे त्यांनी सांगितलं. गायकवाड यांनी त्यास होकार दर्शविला.
१५ रुपयांचा चार्ज गायकवाड यांनी आपल्या मोबाईल क्रमांकावरून ९४२२२४८४९० या क्रमांकाच्या मोबाईलवर ‘फोन पे’द्वारे पाठवले. मात्र, हे ट्रान्झॅक्शन रद्द झाले. त्यानंतर गायकवाड यांना ९८२७३२९४५८ या मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. त्यांनी त्या नंबरवर १५ रुपये पाठविण्यास सांगितले. या क्रमांकावर पैसे पाठवले असता तेही ट्रान्झॅक्शनही रद्द झाले. मात्र, त्याचवेळी गायकवाड यांच्या निदर्शनास एक धक्कादायक बाब आली. ती म्हणजे, त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ९९ हजार ९९९ रुपये काढण्यात आले. तसा मेसेज त्यांना बँकेद्वारे प्राप्त झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी तातडीने मुंबई नाका पोलिस स्टेशन गाठले. तेथे रितसर तक्रार दिली आहे. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक आहिरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.