विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘कुछ नहीं होता’, ‘क्या फर्क पडता है‘ या मानसिकतेतून पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी वेगवेगळ्या कंपन्यांची लस घेण्याचे काही प्रकार पुढे आले. त्यातून जागतिक आरोग्य संघटनेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशा प्रकारचा शहाणपणा करणे चांगलेच महागात पडेल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.
जगभरात कोरोनाच्या विरोधात युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशात लसीच्या मिक्सिंग आणि मॅचिंगचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात यासंदर्भातील कुठलाही डेटा पुढे आलेला नसला तरीही ते धोकादायक असल्याचा इशारा डब्ल्यूएचओने दिला आहे. अशाप्रकारचे मिक्सिंग केल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतो, हे सांगण्यासाठी अद्याप कुठलाही डेटा उपलब्ध नाही. पण हा ट्रेंड धोकादायक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
एका आनलाईन ब्रिफिंगदरम्यान डॉ. स्वामीनाथन यांनी या बाबी स्पष्ट केल्या. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांची लस घेतली जाते. फायझर, एस्ट्रेजेनेका, स्पुटनिक या सर्व कंपन्यांचे दोन डोस दिले जात आहेत. मात्र सर्व कंपन्यांच्या दोन डोजमधील अंतर वेगवेगळे आहे.
स्पुटनिक व्ही लाईट आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा केवळ एकच डोस दिला जात आहे. मिक्स आणि मॅचिंगच्या संदर्भात अत्यंत मर्यादित डेटा उपलब्ध आहे. यावर अद्याप अध्ययन सुरू असून त्याची प्रतिक्षा करावी लागेल. एखादवेळला हा चांगला प्रयत्न असेल मात्र धोकादायकही ठरू शकतो, अशी भिती डॉ. स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या देशांमधील नागरिकच जर लस कधी घ्यायचे आणि कसे घ्यायचे हे ठरवायला लागले तर अत्यंत वाईट स्थिती जगावर येईल, असेही त्या म्हणाल्या.
समान वितरण आवश्यक
संपूर्ण जगात लसीचे समान वितरण आवश्यक असल्याचेही डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या. बुस्टर शॉटची किती आवश्यकता आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. विशेषतः लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर तर मुळीच नाही, असेही त्या म्हणाल्या.