नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सलग अकरा आठवड्यांच्या घसरणीनंतर भारतात या आठवड्यात पुन्हा एकदा कोविड विषाणूने डोके वर काढले आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि जवळच्या राज्यांमध्ये कोरोनारुग्णांच्या संख्येने उसळी घेतली आहे. गेल्या सात दिवसांत रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. ही वाढ तीन राज्यांपर्यंत मर्यादित असली तरी वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा काळजी वाढली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतात रविवारी (११-१७ एप्रिल) रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात जवळपास ६,६१० नवे रुग्ण नोंदविण्यात आले. ही रुग्णसंख्या त्याच्या मागील सात दिवसांच्या ४,९०० रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे.
यापूर्वी मागील आठवड्यात ७,०१० नवे रुग्ण आढळले होते. परंतु या वेळी नव्या रुग्णांमध्ये केरळचे रुग्ण नाहीत. कारण या आठवड्यापासून कोविड डेटा जारी करणे केरळ सरकारने बंद केले आहे. केरळमध्ये मागील आठवड्यात (४-१० एप्रिल) २,१८५ रुग्ण आढळले होते.
देशात विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीत घट झाली आहे. आठवड्यात २७ नव्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या २३ ते २९ मार्च २०२० नंतर दोन वर्षांत सर्वात कमी संख्या नोंदवली आहे. गेल्या आठवड्यात एकूण ५४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये एकट्या केरळमध्ये १३ जण दगावले होते.
रुग्णसंख्येत वाढ झालेल्या सर्व तीन राज्यांमध्ये एका आठवड्याच्या आत दुप्पटहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये नव्या रुग्णांची संख्या २,३०७ इतकी सर्वाधिक आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ९४३ इतकी म्हणजेच १४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत नोंदवलेल्या सर्व रुग्णांमध्ये एक तृतीयांशहून अधिकचे योगदान आहे.
दिल्लीत रविवारी कोविडचे ५१७ नवे रुग्ण आढळले. तेथील संसर्गाचा दर ४.२१ टक्के नोंदवला आहे. शहरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे काल कोणाचाही मृत्यू झाला नाही, असे आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
हरियाणामध्ये साप्ताहिक रुग्णसंख्येत वाढ होऊन ती १,११९ इतकी झाली आहे. गेल्या आठवड्यात ५१४ रुग्ण नोंदवले होते. त्यातुलनेत ११८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये रुग्णसंख्येत १४१ टक्क्यांची वृद्धी झाली आहे. यूपीमध्ये या आठवड्यात ५४० रुग्ण नोंदवले, गेल्या आठवड्यात २२४ रुग्ण आढळले होते. दिल्लीच्या जवळच्या एनसीआर भागातील नोएडा, गुडगाव, गाझियाबाद या शहरांमध्ये रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे.
देशातील इतर राज्यांमध्ये कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थानमध्ये साप्ताहिक रुग्णसंख्या पूर्वी होती तशीच आहे. गुजरातमध्ये गेल्या आठवड्यात दिसून आलेली रुग्णवाढ या आठवड्यात दिसली नाही. या आठवड्यात गुजरातमध्ये ११० रुग्ण आढळले. गेल्या आठवड्यात ११५ रुग्ण आढळले होते. राजस्थानमध्ये रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे. या आठवड्यात ६७ च्या तुलनेत ९० रुग्ण नोंदवले आहेत.