नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना रुग्णसंख्या घटल्याने देशभरात नुकतेच निर्बंध मागे घेण्यात आले होते. जनजीवनही सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती. परंतु पुन्हा एकदा रुग्णसंख्या उसळी घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारीचा हवाला देत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
देशात कोरोना संक्रमणाचा धोका पुन्हा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या पाच दिवसांमध्ये संसर्गाचा दर ०.२१ टक्क्यांवरून वाढून ०.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. दैनंदिन नव्या रुग्णसंख्येचा विचार केला तर रविवारी आढळलेल्या ११५४ रुग्णांच्या तुलनेत सोमवारी ८६१ रुग्ण कमी आढळले आहेत. संक्रमित झालेल्या एकूण लोकांची संख्या वाढून ४,३०,३६,१३२ इतकी झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून ११,०५८ इतकी झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात कोरोना संसर्गामुळे सहा रुग्ण आढळल्यानंतर आता मृतांची एकूण संख्या वाढून ५,२१,६९१ इतकी झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या घटून ११,०५८ इतकी राहिली आहे. ही संख्या एकूण रुग्णांच्या ०.०३ टक्के आहे. गेल्या २४ तासात उपचाराधीन रुग्णांची संख्या ७४ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.७६ टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण ४,२५,०३,३८३ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. कोविडमुळे मृत्यूचा दर १.२१ टक्के आहे.
बुस्टर डोसला प्रतिसाद
देशात १८ वर्षांपासून ते ५९ वर्षे वयाच्या नागरिकांना रविवारी पहिल्या दिवशी कोविड विरोधी लशीचे एकूण ९,६७४ सावधगिरीचे डोस देण्यात आले आहेत. देशभरात देण्यात आलेल्या डोसची संख्या वाढून १८५.७४ कोटी झाली आहे. ज्यांचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले असतील, ते बुस्टर डोस घेण्यास पात्र आहेत. १२ ते १४ वर्षांच्या २.२२ कोटी (२,२२,६७,५१९) मुलांना कोविडविरोधी लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
कोरोना संसर्गाचा वाढता दर
तारीख – संसर्गाचा दर – नवे रुग्ण
०७ एप्रिल – ०.२१ – १०३३
०८ एप्रिल – ०.२४ – ११०९
०९ एप्रिल – ०.२५ – ११५०
१० एप्रिल – ०.२५ – ११५४
११ एप्रिल – ०.३२ – ८६१
स्रोत – केंद्रीय आरोग्य मंत्रालय