इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चीनमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ५२८० नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. वुहानमध्ये साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यानंतर ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक प्रकरणे मानली जात आहेत. वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर चीनमधील १३ शहरे आणि परिसरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. व्हायरसच्या ओमिक्रॉन आवताराचा नवीन प्रकार देशात पसरला आहे.
सध्याच्या काळात जिलिन प्रांतात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय चीनचे तांत्रिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेनझेन प्रांतातही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे ५ कोटी चीनी नागरिक त्यांच्या घरात कैद झाले आहेत. मंगळवारपर्यंत देशभरातील सुमारे १३ शहरे पूर्ण लॉकडाऊन अंतर्गत ठेवण्यात आली आहेत आणि इतर अनेक शहरे देखील काही प्रमाणात लॉकडाऊन अंतर्गत आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनमधील वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे अत्यंत कठोर पद्धतीने राबवली गेलेली ‘झिरो कोविड पॉलिसी’देखील कुचकामी ठरत आहे. शांघाय या औद्योगिक शहरामध्ये निवासी भागात आणि कार्यालयाच्या परिसरात पुन्हा एकदा कडक नियम लागू करण्यात आले आहेत. शहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिलिन प्रांतात तात्पुरत्या रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सहा हजार खाटांचे तात्पुरते रुग्णालय आठवडाभरात कार्यान्वित होईल, अशी अपेक्षाही तेथील प्रशासनाने व्यक्त केली आहे.
महामारीग्रस्तांची नेमकी आकडेवारी जाहीर न केल्याचा आरोप चीनवर अनेकदा करण्यात आला आहे. पण यावेळी संसर्गाची परिस्थिती आधीच गंभीर बनली आहे. शांघायमधील दोन आणि शेन्झेनमधील एक रुग्णालये १२ मार्चपूर्वी बांधण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढवण्यात आल्या होत्या.
सीक्रेट ओमिक्रॉन (बीए.२) चीनमध्ये खूप वेगाने पसरत आहे. हे मूळ ओमिक्रॉन फॉर्मपेक्षा दहापट अधिक शक्तिशाली असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील अनेक शहरे या व्हायरसच्या विळख्यात आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत असलेल्या शांघाय टॉवरलाही सील ठोकण्यात आले आहे. याशिवाय इतर अनेक शहरांमध्ये कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या तयारीवरून असे दिसून येते की चीनमध्ये जवळपास महिनाभर चौथी लाट पसरली आहे.