नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले असून, वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. हिमाचल प्रदेशापासून ते केरळपर्यंत २८ जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा वेग वाढत असल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रेड झोन घोषित केला आहे. यामध्ये साप्ताहिक संसर्गाचा पाच टक्क्याहून अधिक दर असलेल्या हरियाणा आणि महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधित राज्यांनी स्थानिक पातळीवर कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.
अरुणाचल प्रदेशसह सात राज्यांमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण वेगाने वाढत आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक २१.४३ टक्के नोंदविण्यात आली आहे. देशातील काही भागात बाधितांची संख्या वाढत आहे.देशात एका दिवसात जवळपास ४० टक्के उसळी घेऊन बुधवारी ५२३३ नवे रुग्ण आढळले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या २८,८५७ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात ३३४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सात जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसापूर्वी ७ जूनला ३७४१ रुग्ण नोंदवण्यात आले होते.
राजधानी दिल्लीमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाच्या नव्या रुग्णांसह संसर्ग दरही वाढला आहे. गेल्या २४ तासात ५६४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. संसर्गाचा दर २.८४ टक्के नोंदवण्यात आला आहे. त्याच्या एका दिवसापूर्वी हाच दर १.२ टक्के होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या एका दिवसात १२,६९९ आरटीपीसीआर आणि ७१७७ अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. गृहविलगीकरणात १०८४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर, रुग्णालयांमध्ये १०० रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याची खूपच कमी गरज दिसून आली आहे. ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे.
विमानात मास्क सक्ती
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानेसुद्धा कोरोना नियम कठोर केले आहेत. एखाद्या व्यक्तीने इशारा देऊनही मास्क घातला नाही, तर संबंधित व्यक्तीला विमानातून खाली उतरवण्याची मुभा देण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच डीजीसीएने महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध विमान कंपन्यांना मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. विमानतळ टर्मिनल परिसरात मास्क न घालणाऱ्या व्यक्तींकडून मोठा दंड आकारण्याच्या सूचनाही डीजीसीएने केल्या आहेत. या कामासाठी स्थानिक पोलीस आणि सुरक्षा संस्थांची मदत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.