राज्याच्या या भागात उष्णतेची लाट
संपूर्ण महाराष्ट्रात निरभ्र आकाशासहित सध्या स्वच्छ वातावरण जाणवत आहे. परंतु महाराष्ट्रातील संपूर्ण खान्देश( नंदुरबार धुळे जळगांव) व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील २ ते ३ दिवस उष्णतेच्या लाटीची शक्यता असुन त्यानंतर कदाचित २ ते डिग्रीने तेथे तापमान उतरू शकते. उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पुढील ५ दिवसात २-३ डिग्रीने दिवसाच्या कमाल तापमानात घट होवु शकते.
दिवसाचे कमाल उच्चं तापमान व आर्द्रतायुक्त व गरम अश्या हवेमुळे मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेच्या काहिलीने जाणवत असलेली अस्वस्थता कायम असुन अजुनही पुढील २ ते ३ दिवस म्हणजे मंगळवार १६ मे पर्यन्त जाणवू शकते असे वाटते.
ताशी १६० ते १७० किमी. चक्रकार वादळी वारा वेगाचे अतितीव्रस्वरूप धारण केलेले ‘ मोखा ‘ चक्रीवादळ आज दुपारी साडेबारा ते दोनच्या दरम्यान बांगलादेश व ब्रम्हदेश सीमेवरील ‘कोक्सबझार'(बांगलादेश) व ‘सीट्टवे’ जवळील कॅऊकपायऊ (ब्रम्हदेश) शहरा दरम्यानच्या किनारपट्टीवर आदळले असुन ते सरळ ब्रम्हदेशाच्या भुभागावरून घुसून आज मध्यरात्री किंवा उद्या(१५ मे)सकाळपर्यंत विरळ होण्याची शक्यता जाणवते.
पूर्व व पूर्वोत्तर राज्यात अतिजोरदार वादळी वारा व जोरदार पावसाव्यतिरिक्त भारत देशाला ह्या चक्रीवादळाचा विशेष धोका नसण्याचे संकेत जाणवत होते. बांगला व ब्रम्हदेशाला मात्र विशेष धोका पोहोचू शकतो, असे वाटते.
बद्री-केदार पर्यटकासाठी तेथील वातावरण सध्या केवळ काहीसे ढगाळलेले राहून अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
इतकेच!
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Alert Climate Forecast Weather Summer Heat Wave