मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ६० वर्षांवरील नागरिकांना कोविड लशीचा तिसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे. याला आपण बूस्टर डोस असेही म्हणू शकतो. ओमिक्रॉनचा धोका वाढल्यामुळे तिसरा डोस घेण्यासाठी नागरिक घाई करत आहेत. याचा गैरफायदा घेऊन काही भामटे संधी साधत आहेत. बूस्टर डोस देण्याचा बहाणा करून काही सायबर गुन्हेगार नागरिकांकडून महत्त्वाची माहिती काढून घेत आहेत. या माहितीचा वापर करून ते नागरिकांच्या बँकेतील रक्कम लंपास करत आहेत.
अशी आहे मोडस ऑपरेंडी
फसवणूक करणारे तुम्हाला फोन करून स्वतः सरकारी कर्मचारी असल्याची बतावणी करतात. हे भामटे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना फोन करत आहेत. लशीचा दोन डोस घेतले आहेत का असे ते विचारतात. काही प्रकरणात कॉलरकडे तुमची संपूर्ण माहिती असते. ते खरे कर्मचारी आहेत असे भासवण्यासाठी तुमचे नाव, वय, पत्ता आणि इतर माहितीची पुष्टी करतात. खरे असल्याचे भासवण्यासाठी कधीकधी हे भामटे लसीकरणाची तारीखही शेअर करतात.
त्यानंतर कॉलर तुम्हाला विचारतात की, तुम्ही कोविड लशीचा बूस्टर डोस घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, त्यासाठी तुम्ही स्लॉट बुक करू इच्छितात का, असे विचारतात. नव्या डोससाठी वेळ आणि तारीख देऊन भामटे मोबाइलवर ओटीपी देण्यासाठी सांगतात. येथूनच फसवणुकीचे खरे काम सुरू होते. हा ओटीपी तुमच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी मागवलेला असतो. ओटीपी सांगितल्यानंतर तुमच्या बँकेतून पैसे हस्तांतरित होऊन भामट्यांच्या अकाउंटमध्ये जातात.
https://twitter.com/SPNashikRural/status/1481226692530425863?s=20
फसवणूक टाळण्यासाठी हे करा
सरकार लशीसाठी फोन करून कोणताही स्लॉट बुक करत नाही, हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे. जर तुम्ही कोविड लशीचा बूस्टर डोस घेण्यासाठी स्लॉट बुक करू इच्छित असाल तर, http://cowin.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच जाऊन बुक करू शकता. तुम्ही आरोग्य सेतू मोबाईल अॅपच्या माध्यमातून पेजवर जाऊ शकतात. जर तुम्ही एक स्लॉट बुक करण्यास सक्षम नसाल, तरीही तुम्ही वैध ओळखपत्र सोबत ठेवून लसीकरण केंद्रावर जाऊन आपला तिसरा डोस घेऊ शकता. साधारतः ओटीपी असणारे मेसेज कोणालाही शेअर करण्याची गरज नसते. ओटीपीसह येणारे मेसेज वाचायला हवेत. त्यामुळे कोणत्या कोडसाठी मेसेजचा वापर केला जात आहे हे कळेल.