इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगभरात दोन वर्ष कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यानंतर आता देशात सर्व काही सुरळीत पणे व्यवहार सुरू आहे. मात्र अद्यापही चीन सारख्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळून येतो. परंतु त्याचबरोबर अन्य काही नवीनच आजार देखील उद्भवले आहेत. त्यातच भारतात एक नवीनच आजार उद्भवल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या कोरोनाच्या संकटानंतर केरळमध्ये टोमॅटो फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात आतापर्यंत सुमारे ८० मुले टोमॅटो फिव्हरच्या विळख्यात सापडली आहेत. हा आजार होण्याचे मुख्य कारण काय आहे, याबद्दल अद्याप माहिती नाही. हा आजार पाच वर्षांखालील मुलांना होतो. विशेष म्हणजे सर्व रुग्ण कोल्लम शहरात आढळले आहेत. त्यात आणखी चिंतेची बाब म्हणजे हा आजार फक्त लहान मुलांनाच होत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या सर्व आजारी मुलांवर केरळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याचा आरोग्य विभाग या परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेवून आहे.
टोमॅटो फिव्हरला टोमॅटो फ्लू असेही म्हणतात. हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे, ज्याचा परिणाम ५ वर्षांखालील मुलांना होतो. बहुतेक बाधित मुलांमध्ये पुरळ उठणे, त्वचेवर जळजळ होणे, डिहायड्रेशन, त्वचेवर फोड येणे अशी लक्षणे दिसत आहेत.
दरम्यान, हा अज्ञात टोमॅटो फिव्हर हा व्हायरल ताप आहे की चिकनगुनिया किंवा डेंग्यू ताप आल्यानंतर दुष्परिणामांचा परिणाम आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या व्हायरल इन्फेक्शनला टोमॅटो फ्लूचे नाव मिळाले आहे कारण हे फोड सामान्यतः गोलाकार आणि लाल रंगाचे आहेत.
टोमॅटो फिव्हरच्या मुख्य लक्षणांमध्ये डिहायड्रेशन, त्वचेवर पुरळ उठणे, त्वचेची जळजळ किंवा खाज सुटणे यांचा समावेश होतो. या संसर्गाने बाधित झालेल्या मुलांच्या शरीरावर टोमॅटोच्या आकाराचे लाल पुरळ दिसून येतात. यासोबतच खूप ताप येणं, सांधे सुजणे, थकवा येणे, अंगदुखी अशी लक्षणेही दिसू शकतात. तसेच डिहायड्रेशनमुळे संक्रमित मुलाचेतोंड कोरडे पडू शकते. हात, गुडघे यांचा रंग बदलणे हे देखील दुसरे लक्षण आहे. काहींना खूप तहानही लागू शकते. मुलांमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हा आजार टाळण्यासाठी उपाय :
– संक्रमित मुलाला उकळलेले स्वच्छ पाणी द्या, जेणेकरून तो हायड्रेटेड राहू शकेल.
– फोड किंवा पुरळांना स्पर्श करणे किंवा खाजवणे टाळावी.
– पुरेशी स्वच्छता राखा, घर आणि मुलांभोवती स्वच्छता ठेवावी.
– कोमट पाण्याने आंघोळ करावी.
– संक्रमित व्यक्तीपासून अंतर ठेवावे.
– सकस आहार घ्यावा.