इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मधुमेही व्यक्तींना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो, आता त्यात आणखी एका त्रासाची भर पडली आहे. मधुमेहाच्या एका औषधामुळे गुप्तांगात संसर्ग झाल्याचे प्रकरण अमेरिका आणि कॅनडामध्ये यापूर्वी समोर आले होते. आता असेच एक प्रकरण भारतातही आढळले आहे. भारतात टाइप-२ डायबिटिजच्या रुग्णांमध्ये दुर्मिळ परंतु गंभीर संसर्गाचे प्रकरण समोर आले आहे.
हा संसर्ग गुप्तांग आणि त्याच्या आसपासच्या भागात दिसून येत आहे. या गंभीर संसर्गाला नॅक्रोटाइजिंग फॅसियाइटिस ऑफ द पेरिनियम किंवा फोर्नियर्स गँगरिन असेही संबोधले जाते. केंद्रीय औषध निकष नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) ने खबरदारी म्हणून राज्यांतील सर्व औषध नियंत्रकांना या संसर्गाला जबाबदार असलेल्या सोडिअम ग्लुकोज कोट्रांसपोर्टर-२ (एसजीएलटी२) या औषधाच्या पाकिटावर यासंदर्भातील इशारा देण्याचा आदेश दिला आहे. कॅनग्लिफ्लोजिन, डापाग्लिप्लोजिन आणि एम्पाग्लाइफ्लोजिन ही औषधे एसजीएलटी २ या फॉर्म्युल्यावर आधारित आहेत. त्यांच्या पाकिटांवर आता इशारा आणि त्याच्याशी संबंधित माहिती द्यावी लागणार आहे.
जर्मनीत राहणारे डॉ. सतीश रंजन सांगतात, अमेरिकेतील औषध संस्था एफडीएने २०१३ मध्ये हे औषध वापरण्यास परवानगी दिली होती. सद्यस्थितीत या औषधाचा मेटफॉर्मिननंतर मधुमेहाचे दुसरे औषध म्हणून वापर केला जातो. विशेषतः मधुमेहाशिवाय हृदयरोग किंवा मूत्रपिंडाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना हे औषध दिले जाते. याच्याशी संबंधित आजारांसाठी हे खूपच परिणामकारक आहे. तसेच ते रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि वजन कमी होऊ देत नाही.
डॉ. रंजन सांगतात, हे औषध सोडियम-ग्लुकोज कोट्रान्सपोर्ट प्रोटिनची पातळी वाढवते. ज्यामुळे मूत्रपिंडात रक्त शुद्धीकरणादरम्यान ग्लुकोज पुन्हा शोषून घेऊ देत नाही आणि जास्तीत जास्त ग्लुकोज मूत्रावाटे शरीराबाहेर निघून जाते. त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते. कॅनडा आणि अमेरिकत या औषधाचे काही दुष्परिणाम समोर येत आहेत. याने मूत्रनलिकेमध्ये संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे. हाडे ठिसूळ होण्यासह कर्करोगाचाही धोका संभावतो. परंतु कोणत्या रुग्णांमध्ये ही समस्या दिसते याचा अजूनही शोध सुरू आहे.
या प्रकरणी भारताच्या आरोग्य मंत्रालयाने संसदेत एका प्रश्नाला उत्तर दिले आहे. केंद्रीय औषध निकष नियंत्रण संस्थेला हेल्थ कॅनडा कम्युनिकेशनच्या एसजीएलटी २ सुरक्षा आढाव्यात माहिती दिली आहे. त्यामध्ये आतड्यांमध्ये जळजळ होण्याच्या दुष्परिणामाबाबत सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या एफडीएनेसुद्धा ड्रग सेफ्टी कम्युनिकेशन्समध्ये या औषधापासून होणाऱ्या संसर्गाविरोधात इशारा दिला आहे.