नवी दिल्ली – अल कायदाचा म्होरक्या आयमान अल जवाहिरीचा मृत्यू झाल्याचा दावा पुन्हा एकदा चुकीचा ठरला आहे. ९/११ च्या हल्ल्याला वीस वर्ष झाल्याच्या स्मृतिदिनानिमित्त इंटरनेटवर प्रसारित झालेल्या ६० मिनिटांच्या व्हिडिओतून हा खुलासा झाला आहे. येरूशलेमचे यहुदीकरण होणार नाही, असे शीर्षक या व्हिडिओला देण्यात आले आहे. या व्हिडिओतून अल जवाहिरीने पुन्हा एकदा अमेरिकेला डिवचले आहे. तो अमेरिकेविरुद्ध विष ओकत असल्याचेही पाहायला मिळत आहे.
अल कायदाचा तत्कालीन म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्या मृत्यूनंतर अल जवाहिरीला अल कायदाचा प्रमुख बनविण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून तो गायब होता. आजारामुळे जवाहिरीचा मृत्यू झाल्याचे वृत्त नोव्हेंबर २०२० मध्ये समोर आले होते. त्यानंतर त्याचा एकही व्हिडिओ आला नव्हता. तसेच त्याच्याबद्दलची माहितीही आली नव्हती. अमेरिकेत ९/११ हल्ल्याच्या स्मृतिदिनीच अल जवाहिरीचा नवा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये अल जवाहिरीचे आरोग्य चांगले दिसत आहे.
अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या हल्ल्याबाबत अल जवाहिरी आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख करताना दिसत आहे. अल जवाहिरी या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, अमेरिकेच्या हृदयाला जखमी करणा-या त्या १९ मुजाहिद्दीन युवकांचा विसर पडता कामा नये. या युवकांनी अमेरिकेला अशी जखम दिली आहे, जी तो विसरू शकला नाही. वीस वर्षांच्या युद्धात अमेरिकेला अखेर अफगाणिस्तानातून माघारी पळावे लागले. इलयास काश्मिरी आणि अल कायदाच्या भारतीय उपखंडातील प्रमुख मौलाना असीम उमर यांचीही अल जवाहिरीने आठवण काढली.
अमेरिकेच्या यादीतील मोस्ट वॉन्टेड
अमेरिकेच्या दहशतवाद्यांच्या मोस्ट वाँटेडच्या यादीत अल जवाहिरीचा समावेश आहे. अमेरिकी नागरिकांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अमेरिकेच्या बाहेर अमेरिकी नागरिकांची हत्येच्या कटातही सहभागी आहे. त्याच्यावर अमेरिकेने अडीच कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. अल जवाहिरीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक देश सतर्क झाले असून, सैनिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.