अक्षय तृतीया अर्थात आखाजी सणाचे महात्म्य
पंचांगाप्रमाणे अनेक प्रकारच्या शुभ गोष्टींची सुरुवात त्याचप्रमाणे मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी मुहूर्त पाहिला जातो. त्यातील साडेतीन मुहूर्त असल्यास मग पंचांग शुद्धी बघण्याची गरज नसते त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया होय.
यंदा १४ मे रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी पूजेसाठी मुहूर्ताची वेळ पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटे पासून दुपारी बारा वाजून सतरा मिनिटे पर्यंत आहे. तर नूतन खरेदी शुभकार्य सुरुवात यासाठीचा मुहूर्त हा दिवसभर आहे.
अक्षय तृतीया या दिवशी सर्व प्रकारचे दान यास विशेष महत्त्व आहे. महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिण्यासाठी सुरुवात या दिवशी केली तर युधिष्ठिर यास अक्षय पात्र प्राप्ती याच दिवशी झाली. पुढे याच अक्षय पात्रातून गरजूंना त्याने आयुष्यभर दान केले. याच दिवशी परशुराम जयंती, अन्नपुर्णा जयंती, गंगा अवतरण जयंती साजरी केली जाते.
विवाहासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सर्व प्रकारची शुभ कार्य, त्याचप्रमाणे मौल्यवान वस्तू खरेदी, नूतन वास्तू प्रवेश हे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केले जातात. कृष्ण सुदामा भेट ही अक्षय तृतीया या दिवशीच झाली होती.
बद्रीनारायण मंदिर यांचे दरवाजे आजच उघडतात. पाडव्याच्या दिवशी स्थानापन्न झालेल्या चैत्रगौरीचे अक्षय तृतीयेला समाप्ती पूजन होते. या समाप्ती पूजनासाठी कैरीची डाळ खीर वाटप करून हळदी कुंकू केले जाते.
अक्षय तृतीया हा सण खान्देशात आखाजी नावाने साजरा केला जातो. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. पूजेनंतर पारंपारिक अहिराणी गाणी व खेळ खेळले जातात.
सांजोऱ्या, शेवया, पुरणपोळ्या पुरणाचे मांडे, आंब्याचा रस असा बेत जेवणासाठी असतो. अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी मध्यम आकाराचा लाल माठ म्हणजे केळा व त्यावर बसेल असा छोटा माठ म्हणजे करा, त्याचप्रमाणे पाट, लाल वस्त्र, तांदूळ पाच प्रकारची फळे, सुट्टी फुले व हार असं साहित्य लागते. या दिवशी पितरांचे पूजन केले जाते.
विष्णू लक्ष्मीपूजन कृष्ण पूजन या देखील या दिवशी केले जाते.