इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैगिंक अत्याचार करणा-या अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी केलेले एन्काऊंटर फेक असल्याचे चोकशी समितीने म्हटले असून पाच पोलिसांवर ठपका ठेवला आहे.
अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपासनजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॅाल्व्हर हिसकावून घेतली. यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. त्यानंतर चौकशी समितिने सादर केलेल्या अहवालात शिंदे याचे पोलिसांनी केलेले एन्काऊंटर फेक असल्याचे समोर आले आहे. रिव्हॅाल्व्हरवर अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे आढळून आलेले नाही. त्यामुळे पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलिस कर्मचारी जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
२३ सप्टेंबर रोजी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला होता. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना ही घटना घडली होती. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॅाल्व्हर खेचली. यानंतर निलेश मोरे यांच्यावर त्याने तीन गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरेंच्या पायाला लागली आणि दोन गोळ्यांचा फायर चुकले असे सांगण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केल्याचा दावा केला होता. पण, आता चौकशी अहवालात एन्काऊंटर फेक असल्याचे म्हटले आहे.