अकोला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्तांतरापासूनच ठाकरे गटाला सतत हादरे बसत आहेत. पण, शिंदे गटातही सारे आलबेल आहे, असे नाही. अकोला जिल्ह्यात शिंदे गटात अंतर्गत कलह विकोपाला गेला आहे. पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाराज पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बाजोरियांविरोधात लेखी तक्रार दिली आहे. त्यातून ते कमिशन एजंट प्रमाणे काम करीत असून मुख्यमंत्र्यांनी दिलेला ३५ कोटींचा विकानिधी कमिशन घेऊन ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला विकल्याचे आरोप करण्यात आला आहे.
राज्यात उद्धव ठाकरेंचे सरकार उलथवत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. शिवसेनेत मोठी फुट पडली. अकोल्यातही २६ पेक्षा जास्त आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश केला होता. आगामी महापालिका, नगर पालिका निवडणुका लक्षात घेऊन पदाधिकारी निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र आता निधीवरूनच शिंदे गटात वाद सुरू झाला आहे.
काय आहेत नेमके आरोप?
लेखी तक्रारीतील आरोपांनुसार गोपीकिशन बाजोरीया यांनी विकास निधीचा गैरवापर केला. विरोधी गटातील ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांकडून कमिशन घेऊन त्यांच्या कामांना निधी दिला. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांची कामे रद्द करण्यात आली. त्यांची पडीक मालमत्ता लोकांनी विकत घ्यावी यासाठी विकासनिधी वापरण्यात आला. बाजोरियांच्या प्रकल्पांमध्ये नाल्यांची कामे करण्यात आली. विकास निधीची मलाई खाण्यातच बाजोरिया गुंग असल्याचा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला आहे.
यांची आहे तक्रार
लेखी तक्रार पत्रावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख अश्विन नवले, महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष निखिल ठाकूर, नितीन मानकर, अकोला पश्चिम शहरप्रमुख मुरलीधर सटाले, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, ललित वानखडे, वैद्यकीय आघाडी प्रमुख गजू मोर, बार्शीटाकळी तालूकाप्रमुख उमेश कोकाटे आणि अकोट तालूकाप्रमुख प्रकाश पाटील अशा 13 पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असलेले पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे हा वाद वेळीच मिटवण्याचे आव्हान नेत्यांपुढे उभे ठाकले आहे.
Akola Politics Shinde Group Leader Serious Allegation