नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– काँग्रेसने नेते राहुल गांधी यांनी दहा दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थितीत करत थेट पुरावे सादर केले. निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून निवडणूक कशी चोरली? असे सांगत त्यांनी त्याबाबतचे पुरावे दिले. डुप्लिकेट मतदार बनावट आणि अवैध पत्ते, एकाच पत्त्यावर मोठ्या प्रमाणात मतदार, अवैध फोटो, फॉर्म ६ चा गैरवापर याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थितीत केले. त्यानंतर निवडणूक आयोगाने रविवारी पत्रकार परिषद घेत मतचोरीच्या आरोपांवर उत्तरे दिली. त्यात त्यांनी समाजवादी पक्षाने केलेल्या तक्रारीच्या पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देतांना सांगितले की, त्यांनी प्रतिज्ञापत्र दिली नाही.
आता या पत्रकार परिषदेनंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर थेट प्रतिज्ञापत्रांच्या पावतीचा पुरावाच दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने दिलेले प्रतिज्ञापत्र मिळालेले नाही असे म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाने आमच्या प्रतिज्ञापत्रांच्या पावतीचा पुरावा म्हणून त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या पावतीकडे पहावे. यावेळी आमची मागणी आहे की निवडणूक आयोगाने आम्हाला पाठवलेली डिजिटल पावती बरोबर आहे असे प्रतिज्ञापत्र द्यावे, अन्यथा ‘निवडणूक आयोगा’सोबत ‘डिजिटल इंडिया’ देखील संशयाच्या भोवऱ्यात येईल. भाजप गेला तर सत्य समोर येईल!