नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भगवान श्री चक्रधर स्वामींच्या अष्टशताद्बी जन्मोत्सावानिमित्त राज्यात सर्वत्र साजरा होत असताना नाशिक नगरीत अत्यंत भव्य प्रमाणात साजरा होत आहे, याचा मला प्रचंड आनंद आणि समाधान वाटत आहे, हा हजारो नव्हे तर लाखो सदभक्तांचा समुदाय बघून आपल्या पंथाचे विचार मंथन होऊन आता आणखी कोट्यावधी जनतेपर्यंत हे विचार निश्चितच पोहोचतील, याचा विश्वास वाटतो. तसेच अखिल भारतीय महानुभव संमेलनात तीन दिवस ज्या मागण्या आणि ठरावांचा वारंवार उल्लेख झाला, त्या मागण्या आता शासन दरबारी पोहोचल्या आहेत. त्याचा केंद्र शासन आणि राज्य शासन निश्चितच विचार करील. किंबहुना त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न देखील होतील, नव्हे त्या पूर्णत्वास जातील, असा मला विश्वास वाटतो. कारण भगवान श्री चक्रधर स्वामी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आता आपल्याला कुठलीही कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन उपाध्य कुलाचार्य महंत वर्धनस्थ बाबा बिडकर यांनी केले.
श्री चक्रधर स्वामी अष्टशताद्बी जन्मोत्सावानिमित्त तीन दिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे आयोजन डोंगरे वसतीगृह मैदानावर करण्यात आले आहे. या संमेलाना शेवटच्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात धर्मसभेच्या आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, गुजरात सरकारचे मंत्री जितुभाई चौधरी अखिल भारतीय धर्म जागरण मंचाचे संयोजक शरदराव ढोले, कविश्वर कुलाचार्य विद्वांस बाबा, महंत कारंजेकर बाबा, महंत खामनिकर बाबा, महंत यक्षदेव बाबा, महंत दर्यापूरकर बाबा, महंत भास्कर बाबा, महंत साळकर बाबा, तपस्विनी आलेगावकर अक्का, तपस्विनी मीराताई, महंत सातारकर बाबा, महंत राहेरगाव बाबा, संमेलन स्वागत समितीचे सदस्य दिनकर पाटील, माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ता गायकवाड, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज अहिरे, आमदार सुनील भुसारा मार्गदर्शक आचार्य प्रवर सुकेणेकर बाबा शास्त्री, महंत चिरडे बाबा, महंत कृष्णराज बाबा मराठे यांच्यासह संत, महंत, तपस्विनी, पुजारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना महंत बिडकर बाबा म्हणाले की नाशिक जिल्हा हा महानुभाव पंथाच्या विचारांचा जिल्हा आहे, या जिल्ह्यात खुद्द भगवान श्री चक्रधर स्वामींचा पदस्पर्श झाला असून त्यांची अनेक चरणांकित स्थानावर मंदिरे उभारण्यात आली आहेत, सध्या देखील आमदार माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या योगदानातून गोदा काठावर ढगातळी आसन या स्थानावरील मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे, ही अत्यंत चांगली गोष्ट असून नाशिक जिल्ह्यातील अन्य चरणांकित स्थानांचाही अशाच प्रकारे मंदिरे उभारली जात आहेत. राज्यातील अन्य ठिकाणी देखील महानुभाव पंथाची मंदिरे उभी राहिल्यास सद्भक्तांना दर्शनाचा लाभ घेता येऊ येईल, असेही महंत बिडकर बाबा म्हणाले.
महानुभाव साहित्याचे अभ्यासक व लेखक महंत बाभुळगावकर बाबा शास्त्री यांनी आपले विचार मांडले. महानुभाव पंथ हा स्मृतीची शिकवण देणारा पंत आहे असे सांगून शास्त्रीजी त्यांनी पंथातील अनेक उदाहरणे दिली, तसेच श्री चक्रधर स्वामींच्या दृष्टांतातील कथा सांगितल्या. जीवनात कोणत्याही गोष्टीचा लोभ धरणे हे वाईट असते, याउलट कमी गरजा मध्ये जगण्याची कला ही माणसाला उच्च विचारांकडे नेते, असेही त्यांनी सांगितले महानुभव पंथातील संत महंत हे त्यागाची शिकवण देतात आणि त्यांनी देखील तसेच आचरण करणे अपेक्षित असते असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी चक्रपाणी महाराजांच्या विचारांचे दाखले दिले तसेच गोविंद प्रभू महाराजांच्या जीवन कार्याचा आढावा यावेळी घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महंत चिरडे बाबा यांनी केले, तर प्रास्ताविक संमेलनाचे आयोजक दिनकर अण्णा पाटील यांनी केले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ता गायकवाड, प्रकाश शेठ घुगे ( सचिव ), प्रकाश शेठ ननावरे (खजिनदार ), प्रभाकर आप्पा भोजने, अरुण महानुभव, विश्वास का. नागरे, छबू नागरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. तसेच काही चुका झाल्यास प्रायचित्त घेतले. यावेळी सर्व संत महंतांचा महानुभाव पंथाची टोपी आणि शाल देऊन सत्कार तथा गौरव करण्यात आला, तसेच अन्य मान्यवरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला सत्कार करण्यात आला, या संमेलनाचे साठी योगदान देणाऱ्या विविध मान्यवर व्यक्तींचाही यावेळी संयोजकांच्या हस्ते आयोजकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महाप्रसाद सर्वांनी लाभ घेतला.
विशेष म्हणजे या तीन दिवस आयोजित संत संमेलनात गायकांनी आपल्या सुमधुर भजनांनी उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले, तसेच तीन दिवस अखंडपणे महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते, धार्मिक ग्रंथ स्टॉल देखील सुरू असल्याने अनेक भाविकांनी ग्रंथ धार्मिक ग्रंथांची खरेदी केली, त्याचप्रमाणे विविध ठिकाणांवर आलेल्या विशेष देवपूजेच्या वंदनासाठी तीन दिवस भाविकांच्या रांगा सुरूच होत्या, लाखो भाविकांनी या देवपूजेचा लाभ घेतला. तीन दिवस अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धपणे सर्व कार्यक्रम संपन्न झाल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले.
Akhil Bhartiy mahanubhav Sammelan Success