नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हनुमान जयंतीचा उत्सव सर्वत्रच उत्साहात साजरा केला जात असतांना हनुमानाच्या जन्मगावी अर्थातच नाशिकच्या अंजनेरीमध्ये तर पहाटेपासूनच भाविकांनी मारूती रायाच दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या अंजनेरी डोंगरावर वायुपुत्र हनुमानाचा जन्म झाला आणि म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले अशी आख्यायिका आहे. रामनवमीपासूनच येथे उत्सवाच्या तयारीला सुरुवात करण्यात येते.
सप्तचिरंजीवांपैकी एक व बुध्दी आणि शक्तीची देवता असलेल्या पवनपुत्र हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा त्र्यंबकेश्वर व परिसरात मोठया भक्तीपुर्ण वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमंताचं जन्मस्थान असलेल्या अंजनेरी पर्वतावर जन्मोत्सव सोहळ्याचं विशेष महत्व आहे. पौराणिक कथेनुसार मारूतीरायाचा जन्म सुर्योदय समयी झाला, त्यामुळे शेकडो भाविक रात्रीच मुक्कामासाठी अंजनेरी गडावर रवाना झाले.
जन्मस्थळी हनुमानाच छोटं मंदिर असुन मंदिरात अंजनी मातेच्या मांडीवर बसलेली बाल हनुमानाची मुर्ती आहे. पहाटे या मुर्तींना शेंदुर लेपन करून साजश्रृंगार करण्यात आला. नंतर विधिवत पुजन करण्यात आले. सुर्योदयाच्या वेळी हनुमंताचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. बजरंग बली च्या जयजरकाराने परिसर दणाणुन गेला. दिवसभर हजारो भाविकांनी डोंगरावर चढून हनुमंताचे दर्शन घेतले. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी भव्य दिव्य अशी पद्मासनातील सिद्ध हनुमानाचे मंदिर आहे, ज्यांना पर्वतावर जाणे शक्य नव्हते अशा व इतर हजारो भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच शहरातील त्र्यंबकेश्वर मंदिरामागील राष्ट्रसंत श्री रामदास स्वामींनी स्थापित केलेले हनुमान मंदिर, ब्रह्मगिरी पर्वतावरील तसेच गंगाद्वार पायथा, गंगासागर तलाव, श्री सिताराम बाबा आश्रम, निलपर्वत, पो.स्टे . समोरील दाक्षिण मुखी हनुमान, अहिल्या बंधाऱ्या शेजारी, श्री परशुराम व्यायामशाळा, छत्रपती शिवाजी व्यायामशाळा, मोती तलाव व्यायामशाळा, श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा आदी विविध ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पो. नि. बिपीन शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. अश्विनी टिळे, यल्लाप्पा खैरे, पो. ह. मुळाणे पो.ह. गंगावणे, पो. शि. मोरे, साळवे, अंजंनेरीचे पोलीस पाटील संजय चव्हाण व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली असून मुर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आले आहे. दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातून भक्तमंडळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने अंजनेरीला दाखल होत असतात. जय हनुमान, रामभक्त हनुमानकी जयच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमुन गेला आहे.