अजमेर, राजस्थान (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सुमारे दीड ते दोन वर्षांपासून मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे बंद होती. सहाजिकच दर्शनासाठी भाविकांना जाता येत नव्हते. परंतु साधारणतः चार महिन्यांपूर्वी मठ, मंदिरे आणि धार्मिक स्थळे खुली झाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दर्शनासाठी गर्दी वाढली आहे. परंतु त्याचबरोबर धार्मिक स्थळांवर येणाऱ्या भाविकांचे पैसे आणि दागिने लंपास करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. अजमेर येथे धार्मिक स्थळावर दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या खिशातील मौल्यवान वस्तू आणि मोबाईल चोरणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. टोळीतील पाच भामट्यांकडून २५ मल्टीमीडिया मोबाईल जप्त केले आहेत. त्यांची किंमत लाखात आहे. पोलीस आरोपींची सध्या कसून चौकशी करत आहेत.
दर्गा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले की, पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार आम्ही विशेष मोहिम राबवित आहोत. याच अंतर्गत दर्गा परिसरामध्ये खिसे तपासण्याच्या मोहिमेत बदमाशांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मोबाईलचा तपास सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये सय्यद इक्बाल, हारून अली, इझार अहमद, मोहम्मद अमीन, (रा. मालेगाव, नाशिक) आणि नदीम अहमद, (रा. आईजागाव) यांना अटक करण्यात आली. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
दर्ग्याला भेट देत असताना एका अज्ञात चोरट्याने त्याच्या हातमोजेतून त्याचा मल्टीमीडिया मोबाइल फोन चोरून नेला. अन्वरच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दर्गा परीसरात बसवलेले सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी तसाप सुरू केला. त्यानुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील सय्यद इक्बाल याच्याकडून मोबाईल फोन जप्त केला. त्याच्याकडून अन्य घटनांचे सहा मल्टीमीडिया मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.
फौजदाराने सांगितले की, सय्यद इक्बालकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने दर्गा परिसरात सक्रिय असलेल्या त्याच्या साथीदारांची माहिती दिली. आम्ही त्यांना पकडले आहे. यामध्ये हारून अलीकडून ६, इझार अहमदकडून ६, मोहम्मद अमीनकडून ४ आणि नदीम अहमदच्या ताब्यातून चोरीचे ३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मोबाईलची अंदाजे किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. दर्ग्यात येताना मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तर, चोरी, स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.