नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाफेडने कांदा खरेदी बंद केली आहे. त्यामुळे कांद्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी राजकीय इच्छाशक्ती हवी आहे. कांद्याच्या प्रश्नावर मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नाफेडने कांदा खरेदी बंद केल्याबाबत पवार म्हणाले की, आम्ही अधिवेशनात मागणी केली की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हजार रुपये अनुदान द्या. राज्य सरकारने तीनशे रुपये जाहीर केले. आम्ही पुन्हा अनुदान वाढवण्याची मागणी केली. अखेर सरकारने साडेतिनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. आम्ही सरकारला सांगितले की, ही थट्टा आहे. उत्पादन खर्च निघत नसताना सरकारी मदतही तुटपुंजी आहे. आम्ही वेगवेगळे कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली.. अधिवेशन २५ तारखेला संपले. आज ३० तारीख आहे.आता बऱ्याच ठिकाणी ऐकू येत आहे की, नाफेडचे केंद्र बंद आहे. याबाबत मी स्वतः मुख्यमंत्री यांच्याशी फोनवरून संवाद साधणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत आणि त्याच्या भरपाईविषयी पवार म्हणाले की, मध्यंतरी राज्य कर्मचारी यांचा संप सुरू होता. अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. काही शेतकऱ्यांना मदत पोहचली नाही. हरभरा केंद्र देखील आणखी सुरू करावे, अशी आमची मागणी आहे.
Ajit Pawar on Onion Farmers Help Government