मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप आणि शिंदे गटात आग लावण्याची कुठलीच संधी विरोधक सोडत नाहीत. भाजप कशापद्धतीने स्वतःचं महत्त्व वाढवून शिंदे गटाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, हे सिद्ध करण्यासाठी विरोधी बाकांवरील सारेच नेते सदैव सज्ज असतात. अर्थसंकल्पाच्या मुद्यावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी ही संधी पुन्हा एकदा साधली.
अर्थसंकल्पापूर्वी पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू होती. यात दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरवणी मागण्यांवर बोलताना अजितदादांनी टोमणा मारला. पुरवणी मागण्यांमध्ये शिंदे गटाच्या तुलनेत भाजपला जास्त निधी मंजूर केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ‘दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षातील मंत्र्यांना ८३ टक्के निधी मंजूर करण्यात आला आहे. तर शिंदे गटाला सतराच (१७%) टक्के निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती सभागृहात देत अजितदादांनी निधीवाटप खात्यांवर अवलंबून असल्याचे म्हटले. अर्थात महत्त्वाची खाती भाजपकडे असल्याचे त्यांना सूचवायचे होते.
‘तुमच्याकडे कुठली खाती आहेत, त्यावर निधी ठरत असतो. काही विभाग असे आहेत, ज्यांना पैसे द्यावेच लागतात. त्यामुळे भाजपच्या वाट्याला जास्त निधी आला असावा,’ असे अजित पवार म्हणाले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून सत्तेचा दोर भाजपने पूर्णपणे आपल्या हातात ठेवला आहे, अशापद्धतीची विधाने विरोधकांनी यापूर्वी अनेकदा केली आहेत. यात भाजपने सगळी महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवून शिंदे गटाला केवळ नावापुरता खाती दिली आहेत, असे विरोधकांना म्हणायचे असते. दादांनी आज पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या त्यावरच भाष्य केले.
तो निर्णय वरीष्ठांचा
नागालँडमध्ये भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय वरिष्ठांचा आहे. राष्ट्रीय निर्णयात वरिष्ठ नेतृत्व सहभागी असतात, मी राज्यातील निर्णय प्रक्रियेत असतो, अशी स्पष्टोक्ती देत ‘शरद पवार यांनी वृत्तवाहिन्यांना एकदा जी माहिती दिली, त्यावर आम्ही पुन्हा वक्तव्ये करीत नाही,’ असेही ते म्हणाले.
ऐनवेळी कामे मंजूर
गेल्यावर्षी अर्थसंकल्पात शिंदे गटाच्या आमदारांची कामे ऐनवेळी मंजूर करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनीच ती कामे मंजूर केली होती. यात ग्रामीण भागातील रस्ते, पूल आदी कामे होती, या शब्दांत अजितदादांनी आरोपांवर खुलासा केला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले त्यांना काहीतरी कारण हवे होते, असेही ते म्हणाले.
Ajit Pawar on BJP and Shinde Group Fund Allotment