शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिर्डी येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय मंथन शिबिराच्या समारोपाच्या प्रसंगी अनेक नेत्यांची उपस्थिती होती. आजारी असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल असतानाही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खास हेलिकॉप्टरने शिर्डी येथे दाखल झाले होते, तर दुसरीकडे संपूर्ण दिवसभर विरोधी पक्षनेते अजित पवार अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीच्या अफावांना आणि उलटसुलट चर्चला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनावेळीही अजित पवार यांनी असेच कार्यक्रमाचे व्यासपीठ सोडले होते. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबिर होत आहे, गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल शनिवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराला हजेरी लावून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्येत बरी नसल्याने ते फारसे बोलू शकले नाहीत. परंतु शिबिराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार यांनी थेट रुग्णालयातून शिबिरात दाखल झाले. त्यामुळे कार्यकत्यांना एक वेगळी ऊर्जा मिळाली.
महत्त्वाचे म्हणजे शरद पवार येणार म्हटल्यावर सकाळपासून कार्यकर्ते यांच्यात जोश व उत्साह दिसत होता. मात्र पक्षाच्या शिबिराला पहिल्या दिवशी हजेरी लावल्यानंतर अजित पवार निघून गेले. तसेच शिबिराच्या दुसर्या दिवशी ते अनुपस्थित होते. याबाबत जयंत पाटील यांनी माहिती दिली. अजित पवार त्यांच्या आजोळी एका कार्यक्रमानिमित्त गेले आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी परवानगी घेतली आहे. त्यामुळे कुठलीही उलटसुलट चर्चा त्यांच्या अनुपस्थितीबाबत होऊ नये, असेही पाटील म्हणाले. मात्र, याच वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अनुपस्थितीने दोघे नाराज असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली. दुसरीकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचे सांगून राजकीय वातावरण तापवले.
दरम्यान, मंथन शिबिराच्या पहिल्या दिवशी एक वेगळाच प्रकार घडला शिबिर ‘विचार मंथन’, संकटात सापडलेल्या शेतकरी, कष्टकरी यांना आधार देण्यासाठी, मात्र शिबिरासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या आलिशान गाड्या, सोबतचा लवाजमा, त्यांचे महागडे मोबाईल, एखाद्याचे प्रदर्शन करणारे सोन्याचे दागिने पाहून अस्वस्थ झालेल्या विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या रागाचा फटका या अशा कार्यकर्त्यांना बसला.
इतकेच नव्हे तर विरोधी पक्ष नेते अजित पवार हे या प्रकाराने अस्वस्थ दिसत होते. अशातच त्यांच्या पुढ्यात असाच एक पदाधिकारी या श्रीमंतीचे प्रदर्शन करत आला. उंची सूट, गळ्यात भरगच्च सोन्याच्या साखळ्या, सर्व बोटांत सोन्याच्या अंगठ्या हे सर्व पाहून अजितदादांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. आपल्या शैलीत राग व्यक्त करत फटकारले, ‘अरे बास, अजून किती सोने घालायचे बाकी ठेवणार आहेस. तू तर पार आपली अब्रूच काढलीस!’, असे अजित पवार यांनी त्याला सुनावले.
उद्घाटनाच्या सत्रापासून शिबीरस्थळी सक्रिय असणारे अजित पवार त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र दिवसभर न दिसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली. तसेच अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यापुर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील एका कार्यक्रमात अजित पवार असेच नाराज होऊन निघून गेले होते. मात्र त्यावेळी आपण नाराज नसून लघुशंकेला गेलो होतो, असे ते म्हणाले होते.
दरम्यान, शरद पवार हजर असलेल्या कार्यक्रमातून अजित पवार सहसा निघून जात नाहीत. मात्र अजित पवार अस्वस्थ असण्याचे कारण म्हणजे सदर शिबीर हे ‘विचार मंथन’, संकटात सापडलेल्या शेतकरी, कष्टकरी यांना आधार देण्यासाठी, राज्यापुढील आव्हानांचा वेध घेण्यासाठी असे जाहीर केलेले असताना शिबिराला एखाद्या उत्सवी सोहळ्याचे आलेले रूप यावरूनही ते नाराज होते, असे समजते.
Ajit Pawar NCP Disappointed Politics Reason