मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र संतांची भूमी आहे, या संतपरंपरेचा महाराष्ट्राला अभिमान आहे. संत ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या भावंडांच्या ७२५ व्या समाधी वर्षानिमित्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्ती महाराजांचे समाधीस्थळ, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ, पुणे जिल्ह्यातील सासवड येथील संत सोपानकाका महाराजांचे समाधी स्थळ, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई यांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. विधानभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पाच टक्के निधी शाळांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा निधी देण्याचा निर्णय उर्दू शाळांना देखील लागू आहे. थोर व्यक्तिमत्वांशी संबंधीत असलेल्या राज्यातील दहा शाळांना प्रत्येकी एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. या दहा शाळांमध्ये 1) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक शाळा, चौंडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर, 2) शिक्षणमहर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांची जन्मभूमी असणाऱ्या पापळ, ता.नांदगाव खंदेश्वर, जि.अमरावती येथील शाळेसह 3) वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी शिक्षण घेतलेल्या जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव-बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक या तीन शाळांचा समावेश करण्यात आला आहे. या तीन शाळांना देखील प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राज्यातील उद्योग, व्यापारी बांधवांना करसवलतीसाठी अभय योजना, नैसर्गिक वायूवरील कर सवलत, मुद्रांक शुल्कात कर सवलत, जलवाहतुकीस चालना देण्यासाठी करमाफी अशा विविध महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्याने या क्षेत्रांच्या, तसंच राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.