मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात झालेल्या घडामोडींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये काय भूमिका मांडली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आज ते स्पष्ट झाले आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत आपली भूमिका मांडत असतात. ती प्रखर असते, पण त्यातून बरेचदा जळफळाटच बघायला मिळतो, असे भाजपचे म्हणणे आहे. रविवारच्या मेलोड्रामानंतर सोमवारच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप आता शिंदेंचे राजकारण पवारांच्या चुलीत घालून त्यावर हात शेकणार आहे, अशी टिका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
आपण शरद पवारांना फोन केला, त्यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगितले, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी अजितदादा व आठ नेत्यांच्या शपथविधीनंतर दिली होती. त्यानंतर आज त्यांनी अग्रलेखातून तिन्ही पक्षांवर जोरदार टिका केली आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेससोबत कधीही युती करणार नाही, असे ओरडून सांगणाऱ्या देवेंद्र फडणविसांनी स्वतःचाच पोपट करून घेतला आहे, असे यात म्हटले आहे. तर दुसरीकडे अजितदादा फक्त उपमुख्यमंत्रीपदासाठी सत्तेत जाणे शक्यच नाही, असा दावाही केला आहे. या अग्रलेखात शिंदे गटाचे मात्र भविष्यात हाल होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असेही नमूद आहे.
शिंदे गटासाठी हा मोठा धक्का असून भविष्यात त्यांच्यावर अपात्रतेचे संकट कोसळणार आहे. अश्यावेळी त्यांच्या हातून सत्ता जाईल आणि पदही जाईल, असे भाकित वर्तवण्यात आले आहे. ‘ज्यांनी स्वाभिमानासाठी वगैरे बतावण्या करून शिवसेना फोडली त्यांचे नशीबच आता फुटले आहे. त्यांचे नकली हिंदुत्वही संपले आहे. शिंदे व त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची तलवार कोसळण्याचा दिवस जवळ आला हाच राजभवनातील रविवारच्या शपथविधीचा खरा अर्थ आहे. एक मिंधे जातील व दुसरे येतील’, असे अग्रलेखात म्हटले आहे.
अजितदादा मुख्यमंत्री होणार?
सामनाच्या अग्रलेखातून अजितदादाच पुढचे मुख्यमंत्री असल्याचा दावा करण्यात आला आहे. फक्त उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार सत्तेत जाऊ शकत नाही. शिंदे गटातील नेत्यांवर अपात्रतेची कारवाई होईल. त्यानंतर शिंदेंचे मुख्यमंत्रीपदही जाईल. अशावेळी भाजप अजितदादांना सिंहासनावर बसवेल, असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.
अजितदादांनी स्वतःची भाकरी थापली
शरद पवार यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लवकरच मिळेल. तोही औटघटकेचाच ठरेल. शिवरायांच्या राज्यात हे काय चालले आहे? असेही सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आले आहे.