मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याने पत्रात वसुलीचे गंभीर आरोप केले असून सीबीआयतर्फे त्याची सखोल चौकशी करावी, अशी विनंती करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बुधवारी भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे पाठवले.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व मा. गणेश हाके उपस्थित होते. भांडारी म्हणाले की, भाजपाच्या २४ जून रोजी झालेल्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत पक्षाने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीची मागणी ठरावाद्वारे केली होती. त्यानंतर मा. प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्याबद्दल आरोपी असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याने एनआयए कोर्टाला एप्रिल महिन्यात एक हस्तलिखित पत्र सादर केले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने दर्शन घोडावत नावाच्या एका व्यक्तीने आपल्याला कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यास सांगितले तर परिवहनमंत्री अनिल परब यांनी आपल्याला मुंबई महापालिकेच्या पन्नास कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये तसेच सैफी ट्रस्टकडूनही खंडणी वसूल करण्यास सांगितले, असे गंभीर आरोप सचिन वाझे याने हस्तलिखित पत्रात केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी होत आहे. त्याचप्रमाणे अजित पवार, अनिल परब आणि दर्शन घोडावत यांच्या विरोधातील वाझेच्या पत्रातील आरोपांची सखोल सीबीआय चौकशी होणे गरजेचे आहे.
पाटील यांनी म्हटले आहे की, प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आणि प्रदेश कार्यसमिती बैठकीत ठराव मंजूर करणाऱ्या दोन हजार पदाधिकाऱ्यांतर्फे आपण ही मागणी करत आहोत. तसेच राज्यातील कायदा पाळणाऱ्या सामान्य नागरिकांच्या वतीनेही आपण ही मागणी करत आहोत.