पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य शासन काम करत आहे. द्राक्ष उत्पादकांमुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने समृद्धी आली आहे. द्राक्ष बागाईतदार संघाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या द्राक्ष परिसंवाद व ६५ वे वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल, वाकड, पुणे येथे आयोजित कार्यक्रमास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शंकरराव मांडेकर, केंद्रीय फलोत्पादन उपसचिव संजय सिंह, कृषी आयुक्त हेमंत वसेकर, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, पुणे एनआरसीजीचे संचालक कौशिक बॅनर्जी, चिली देशाचे द्राक्ष शास्त्रज्ञ कार्लोस फ्लोडी, संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, संघाचे खजिनदार शिवाजीराव पवार, मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष अभिषेक कांचन आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, द्राक्ष बागाईतदार संघाच्या अध्यक्षांनी मांडलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेवून त्यावर चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेऊ. केंद्रीय स्तरावरील मागण्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करुन दिल्लीत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक लावण्यात येईल. मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून अडचण येणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यातील गरीबातल्यागरीब माणसाची प्रगती झाली पाहिजे यासाठी शासन काम करीत आहे. शेतकरी हीच आपली जात असून आपण शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जात आहोत. शेतकऱ्यांना समाधानी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना आणत असतो; पण त्यामुळे बाजारातील स्पर्धेकडे दुर्लक्ष होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
द्राक्ष बागाईतदार संघाच्या वतीने श्री. भोसले यांनी केलेल्या राज्य शासनाच्या कार्यक्षेत्रातील मागण्या आगामी विधिमंडळ अधिवेशनाच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करू. देशांतर्गत बाजारपेठ खूप मोठी आहे; शेतकऱ्यांनी या बाजारावरही लक्ष द्यावे. आपण उत्पादीत केलेल्या मालासाठी आपली बाजारपेठ कशी निर्माण करू शकतो याबाबत काम सुरू आहे, असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, संघाला योग्य ठिकाणी, योग्य तेवढा निधी देण्यासाठी प्रयत्न करू. ड्रोन फवारणीसाठी राज्य शासन अनुदान देत असून, यात महिला बचतगटांना प्राधान्याने संधी देणार आहोत.
कृषिमंत्री श्री. भरणे म्हणाले, मी स्वत: द्राक्ष बागाईतदार आहे, त्यानंतर कृषिमंत्री. तुमचे प्रश्न कुटुंबातलेच प्रश्न असून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे यासाठी काळजी घेऊ. संघाच्या अध्यक्षांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेतली जाईल. द्राक्ष बागाईतदार बांधवांच्या शेतमालाच्या मार्केटिंगसाठी राज्याचा कृषी विभाग सदैव प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले.
संघाचे अध्यक्ष श्री. भोसले यांनी कृषि विभागास एआय तंत्रज्ञानाच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल तसेच बेदाणा चाळीसाठी अनुदान वाढविल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे आभार व्यक्त केले.
श्री. भोसले यांनी यावेळी सौरपंप योजनेत सुधारणा होण्याची गरज असून सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन १० एचपी मोटारपंप धारकांनाही वीज बिलातून माफी मिळावी, अशी विनंती केली. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुरू केलेल्या कव्हर क्रॉप पायलट योजनेत सुधारणेची गरज आहे; जाचक अटींमुळे आणि महाग संसाधने तसेच अवाढव्य करप्रणालीमुळे गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. आगामी काळात देशभरात द्राक्ष महोत्सव आयोजित करण्याचा संघाचा मानस असल्याचे सांगून शेती भाडेकरारावरील स्टॅम्प ड्युटी ५० टक्क्यांवरुन १ टक्क्यावर आणावी, पूर्वोत्तर भागात द्राक्ष पोहोचवण्याची रेफ्रिजरेटेड व्हॅन उपलब्ध करून द्यावी, परिवहन खात्याच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या जाचक नियमांतून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला वगळावे, १ रुपयात द्राक्ष पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी, आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याहस्ते कृषिभूषण सुरेश एकनाथ कळमकर, द्राक्ष शास्त्रज्ञ कार्लोस फ्लोडी (चिली) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘द्राक्ष वृत्त’ या स्मरणिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. पवार यांनी येथे उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील विविध कंपन्यांच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. या कार्यक्रमाला द्राक्ष बागायत संघाचे आजी-माजी पदाधिकारी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, राज्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी मोठ्या सेख्येने उपस्थित होते.