मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई शहर, उपनगरासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज काही ठिकाणी पावसाची तीव्रता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईसह राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
हवामान खात्याने मुंबई, रायगड, जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील ४८ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक गरज असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले आहे.
आपत्तीच्या परिस्थितीत प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा यंत्रणांना सतर्क राहून नागरिकांची सुरक्षितता, बचाव व मदतकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यासाठीच्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
मुसळधार पाऊस सुरु असलेल्या भागातील नागरिकांनी शक्यतो घरीच थांबावे. घरात पाणी भरण्याची शक्यता असल्यास सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. आत्यंतिक गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून त्यांच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे. राज्य शासन व स्थानिक स्वराज संस्थांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आपले कर्तव्य पार पाडत असताना स्वत:चीही काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.