इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत. पवार यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. १६ डिसेंबर रोजी पवार यांना न्यायालयात हजर राहावे लागेल.
२०१४ विधानसभा निवडणुकीच्या वेळचे हे प्रकरण आहे. बारामती तालुक्यात मतदारांना अजित पवार यांनी धमकी दिली होती. त्या वेळी निवडणूक प्रचार संपल्यानंतरही मासाळवाडी या गावामध्ये पवार गेले होते. त्या वेळी गावातील लोकांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही, तर गावचे पाणी बंद करू, अशी थेट धमकी दिली होती. तसेच तुमचा पाणी प्रश्न दोन महिन्यांत सोडवतो; परंतु मतदान आम्हालाच करा, असे पवार यांनी म्हटले होते. पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स आले आहे. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली. २०१४ च्या निवडणुकीत पवार यांनी उमेदवाराला मतदान केले नाही, तर गावचे पाणी बंद करू अस वक्तव्य केल्यामुळे कोर्टाने हे समन्स बजावले असल्याचे खोपडे यांनी सांगितले.
२०१४ च्या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवार सुप्रिया सुळे यांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. प्रचार करत होते; परंतु दहा वर्षानंतर सुनावणीस आलेल्या या प्रकरणात आता बरेच बदल झाले आहे. आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे परस्परांविरोधात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा आणि अजित पवार यांची बहीण खा. सुळे यांच्यात लढत झाली होती. त्यात सुळे यांचा विजय झाला होता.