इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटात ‘घड्याळ’ या पक्षचिन्हावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. अजित पवार गटाने घड्याळ चिन्ह वापरू नये, यासाठी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अद्याप या प्रकरणी सुनावणी पूर्ण झालेली नाही. तत्पूर्वी घड्याळ चिन्ह वापरताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते. आता अजित पवार गटाने टीव्हीवर प्रदर्शित केलेल्या व्हिडीओ जाहिरातीवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे.
‘आता घड्याळाचे बटन दाबणार, सर्वांना सांगणार’ या जाहिरातीला महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने नकार दिला आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यस्तरीय प्रमाणिकरण समितीसमोर निवडणूक प्रचारासाठी आपल्या टीव्ही जाहिरातीच्या पूर्व-प्रमाणिकरणासाठी अर्ज केला होता. तथापि, राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडीओ जाहिरातीमध्ये दिलेल्या काही भागावर आक्षेप घेतला आहे. एक पत्नी आपल्या पतीला विनोदाने म्हणते, “आता तुम्हीही राष्ट्रवादीला मत द्या नाहीतर आज रात्री मी तुम्हाला खायला घालणार नाही.”
एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळे कुणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. जाहिरातीतील संभाषण पत्नीकडून नवऱ्याला दिलेली धमकी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे आणि पक्षाला जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी हा भाग काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.