सुदर्शन सारडा:
गत तीन विधानसभेच्या निफाड मधल्या निवडणुकीतील राजकारण निफाड सहकारी साखर कारखान्याच्या अस्तित्व भोवती फिरत असताना यंदाही अजितदादांनी त्याच निसाकाच्या मुद्द्याला स्पर्श करत ‘तेच’ आश्वासन दिले खरे परंतु त्यांनी भाषण करताना जुन्या गाण्याला स्वर,ताल,चाल अन् लय नवी लावली.
निफाडचे सहकार धोरण रसातळाला जाऊन आता दशकाच्या वर कालावधी लोटेल परंतु त्याबाबत अद्याप तरी ठोस उपाययोजना काय अन् कशा कराव्या हे मनात घेताना कुणी दिसले नाही. मागच्या विधानसभेच्या प्रचारात अजित पवारांनी तुम्ही दिलीप बनकर यांना निवडून द्या मी निसाका सुरू करतो असे आश्वासन दिले. त्यावेळी तालुक्याने काकांना विधी मंडळात पाठवलेही परंतु गेले गणपतीला अन् भेटले मारुती अशी स्थिती नंतरच्या काळात झाली.निफाड सुरू होण्याऐवजी रानवड सुरू झाला.सुरवातीला लोकांनी त्याचे स्वागत केले पण निफाड आणि रानवड यातील अवाढव्य फरक जेव्हा लक्षात आले तेव्हा खरे चित्र सामान्यांच्या डोळ्यासमोर आले.
सहकार बाबत निफाड हा एकेकाळी राज्यातील इतर तालुक्यांचा आदर्श होता पण याच आदर्शाची अधिपतनाकडे वाटचाल सुरू झाली आणि निफाडची सहकार ओळख नामशेष झाली.काही वर्षांपूर्वी दिलीप काकांच्या पतसंस्थेने रानवड कारखाना चालवायला घेतला पण सद्यस्थितीत त्याची नेमकी पोझिशन काय हे सांगता येणार नाही.
सध्याच्या निवडणूक प्रचारात पुन्हा निसाका नीट नेटका सुरू करण्याचे हिरवे बटण भाषणाचे केंद्रबिंदू होऊ पाहत असताना त्याला अजितदादांनी मात्र रिंगरोड सारखा रस्ता दिला आहे.निसाका कार्यस्थळ आजही अनेक जणांचे आशास्थान अन् श्रध्दास्थान आहे पण तो स्थळ भग्न झाला आहे त्याच्या चिमण्या गांजल्या,मशिनरी जुनाट झाली,शिल्लक काही शे एकर जागा आजही कागदावर मंजूर असलेल्या ड्रायपोर्टच्या नावावर गेली.
आता केवळ कारखाना अन् समोरील कार्यस्थळ उरले असताना बी.टी कडलग आणि हेमंत गोडसे यांच्या कंपनीला दिलेला कारखाना पुन्हा सभासदांना देण्याच्या शाब्दिक हालचाली प्रचार सभेत दादांनी केल्या आहे त्यातून निर्माण झालेला गोडवा हा अल्प काळ असेल असे काही सहकारातील जाणकार सांगतात परंतु लाखो शेतकऱ्यांच्या अंतर्मनात निसाका बाबत आत्मीयता आजही तीच आहे कारण त्यात निफाड हे नाव आहे. त्यामुळे अजितदादा नेमका कोणता नियम लावून पुन्हा कार्यस्थळ वरची धूळ झटकतात की ही देखील निवडणूक घोषणा ठरते हे येणारा काळ सांगेल.