इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘ बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. बीडमधील प्रचार सभेत अजित पवार म्हणाले, ‘बटेंगे तो कटेंगे’ उत्तर प्रदेशात चालेल; पण महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्र हा साधु-संतांचा, शिवप्रेमींचा, शाहू फुले आंबेडकरांचा आहे.’
बीडमधील प्रचारसभेत पवार म्हणाले, की कोणी काही बोलले तर त्याचे आम्ही समर्थन करणार नाही. आम्ही येथील जनतेच्या पाठिशी आहोत. आमच्याकडून मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. माझी विचारधारा शिव-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित आहेत. आम्ही जात, पंथ, नात्याच्या आधारावर भेदभाव करत नाही. भेदभावामुळे समाजाची हानी होते. मी आमच्या वाट्याला आलेल्या जागांतून दहा टक्के जागा मुस्लिम समाजाला दिल्या आहेत. पराभूत होणाऱ्या जागा दिल्या नाहीत. ज्या जागांवर मुस्लिम समाजाचे उमेदवार निवडून आले ते मी दिले आहेत. मी नजीबमुल्ला यांना तिकीट दिले, नवाब मलिक यांना तिकीट दिले. मला विरोध झाला पण मी स्वतः त्यांच्या प्रचारासाठी गेलो होतो. सना मलिक यांच्या प्रचारासाठीही मी गेलो होतो. झिशान सिद्दीकी यांनाही आम्ही तिकीट दिले. हसन मुश्रीफ, शेख आणि अशा अनेक कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिले आहे.
आम्ही महायुतीमध्ये एकत्र काम करत आहोत; पण आमच्या पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत, असे पवार म्हणाले. आपण सर्वजण किमान समान कार्यक्रमावर आपले सरकार चालवतो. देशाच्या विकासासाठी आपण सर्वजण काम करत आहोत. आजही आम्ही शिव, शाहू, फुलेंच्या विचारांनी पुढे जात आहोत. इतर राज्यात हे चालेल; पण महाराष्ट्रात ते चालणार नाही. भाजपच्या इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काय बोलावे, ते त्यांचे त्यांनी ठरवावे, असे त्यांनी सुनावले.