इंडिया दर्पण ऑनालईन डेस्क
पुणेः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या विधानावर भाजप आणि शिवसेना शिंदे गट आघाडीवर खेळत असतील; परंतु त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुगली टाकून महायुतीला क्लीन बाऊल दिला, त्यानंतर विरोधकांनीही महायुतीला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली असून तिसरा पंच जनताच राहिली आहे. ती विधानसभा निवडणुकीत महायुती, की महाविकास आघाडीच्या पाठिशी राहणार, हे २३ तारखेला ठरणार आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी दिलेले उत्तर महायुतीच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. पवार यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हवाला देत या विधानाचे समर्थन करण्यास नकार दिला. अजित पवार यांनी योगी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले नाही. मुख्यमंत्री योगींच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, की महाराष्ट्र शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहे. महाराष्ट्राची इतर राज्यांशी तुलना करू नका. महाराष्ट्राला हे कधीच आवडत नाही. शिवाजी महाराज, शाहू, आंबेडकर, फुले यांची विचारधारा सर्वांना बरोबर घेऊन चालणारी होती. बाहेरून लोक येतात आणि आपली मते सांगून निघून जातात. महाराष्ट्राने हे कधीच मान्य केले नाही. हा महाराष्ट्राचा आजपर्यंतचा इतिहास आहे.
अजित पवारांच्या या गुगलीचे लोकांना आश्चर्य वाटेल; पण अजित पवारांच्या या वक्तव्यामागे एक कारण आहे. अजित पवारांचे मतदार हिंदूच नाहीत, तर मुस्लिमही आहेत. पवार यांनी, तर १० टक्के मुस्लिम उमेदवार देण्याची भाषा केली होती. पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार बहुतांश जागा लढवत आहेत, तिथे मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका बजावतात. अशा स्थितीत अजित हे विधान विचारपूर्वक करत आहेत. हे निश्चित. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांना महायुतीला घेरण्याची आयती संधी मिळाली. त्यांनी भाजपसह शिंदे व अजित गटाला गोत्यात उभे केले.
ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी स्पष्टपणे सांगितले, की अजित पवार हे विधान का करत आहेत, हे मला चांगलेच माहीत आहे. ही त्यांची मजबुरी आहे. तसे न केल्यास त्यांच्यासाठी अवघड जाईल आणि त्यामुळेच मुस्लिम मतदारांमध्ये आपला प्रभाव टिकवण्यासाठी त्यांनी मुद्दाम असे वक्तव्य केले आहे. आता या वक्तव्यावर भाजप आणि शिंदे गप्प का? राज्याची संस्कृती फूट पाडण्याची नाही आणि हीच विचारसरणी अजित पवारांना उपयोगी पडेल.