मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही काम करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. हे सर्व कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याच्या बाहेर दाखल झाले असून त्यांनी भुजबळ साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.
यावेळी राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडू पण, कांदे यांचे काम करणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. ४०० ते ५०० कार्यकर्ते देवगिरी निवास्थानी दाखल झाले असून त्यांनी नांदगावची जागा राष्ट्रवादीला मिळावी किंवा शिवसेनेने उमेदवार बदलावा अशी भूमिका घेतली आहे.
या विधानसभा मतदार संघात २०१९ मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढली. यात शिवसेनेचे सुहास कांदे विजयी झाले तर पंकज भुजबळ यांचा पराभव झाला. याअगोदर पंकज भुजबळ दोन वेळेस या मतदार संघातून निवडून गेले आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादीने आपला हक्का सांगितला असून समीर भुजबळ येथे उमेदवारी करण्यास इच्छुक आहे. ते महायुतीतून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष किंवा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्याची शक्यता असल्याचेही बोलले जाते.