कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – शरद पवार व अजित पवार यांच्या पुणे येथील गुप्त बैठकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या भेटीचा इन्कार केला नाही. पण चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच असे त्यांनी सांगत पुन्हा धक्का दिला.
ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले. मी उथळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता मला लपून जाण्याचे कारण काय ? असा सवालही त्यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, पुण्याच्या बैठकीचे काही मनावर घेऊ नका. पवारसाहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका.
चोरडिया यांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते
पुण्यात ज्यांच्या घरी ही गुप्त बैठक झाली त्यावरही अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. चोरडिया यांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते आहे. चोरडिया हे पवारसाहेबांचे क्लासमेट आहेत. चोरडिया यांनी पवार साहेबांना जेवायला बोलावले होते. त्यावेळी जयंत पाटील देखील त्याठिकाणी पवारसाहेब यांच्यासोबत होते.
गैरसमज निर्माण होत आहेत.
कारण नसताना याला काहीजण वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी देत आहेत. त्यातून समज गैरसमज निर्माण होत आहेत. दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाणे काय चुकीचे ? असे सांगत त्यांनी मी नात्यानं शरद पवार यांचा पुतण्या लागतो हेही सांगितले.
दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी दिले होते हे स्पष्टीकरण
याअगोदर शरद पवार यांनी दोन दिवसापूर्वी दिलेल्या स्पष्टीकरणात सांगितले होती की, माझ्यातील आणि अजित पवार यांच्यातील बैठक गुप्त नव्हती. अजित पवार हा माझा पुतण्या आहे आणि पवार कुटुंबातील वडिलधारा माणूस मी आहे. त्यामुळे मला कुणी भेटायला आले किंवा मी कुणाला भेटायला बोलावले हा चर्चेचा विषय बनू शकत नाही. कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय ? असेही ते म्हणाले.