मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज राज्याच्या अर्थखात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर ते अचानक रात्री शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते पहिल्यांदाच गेल्यामुळे सर्वांच्या भुवैय्या उंचावल्या. पण, या भेटीमागील कारण कौटुंबिक असल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांच्या सौभाग्यवती आणि अजित पवार यांच्या काकू प्रतिभा पवार यांची शस्त्रक्रिया झाल्याने अजित पवार हे सिल्व्हर ओकवर गेले.
प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी अजित पवार गेले. ही भेट कौटुंबिक असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले. आजच अजित पवार यांच्या नव्या दालनात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला. त्यामुळे हा विषय सुध्दा चर्चेत असतांना अचानक सिल्व्हर ओकवर केल्यामुळे अनेकांनी त्याचा राजकीय अर्थ काढला. पण, त्यानंतर ही भेट कौटुंबिक असल्याचे समजल्यानंतर त्यामागील कारणही पुढे आले.
अजित पवार यांनी याअगोदरही शरद पवार आजही आपल्यासाठी सर्वोच्च स्थानी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय विरोध असला तरी कौटुंबिक नाते या विरोधानंतरही जपले जाणार असल्याचे संकेत या भेटीमुळे स्पष्ट झाले आहे.