मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी एका घोषणेने सभागृह दणाणून गेले. शिवाय त्याची चर्चा सध्या राज्यभरात होत आहे.
विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले सत्यजित तांबे यांना शपथ देण्यासाठी व्यासपीठावर बोलविण्यात आले. ही घोषणा होताच उपस्थित तांबे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पहिले दादा अजित दादा…. दुसरे दादा सत्यजित दादा… अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. नाशिकची ही निवडणूक राज्यभरातच गाजते आहे. या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील तथा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. तांबे हे अपक्ष निवडून आले. या निवडणुकीतील राजकारणही सध्या जोरदार चर्चेत आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलह सुद्धा यानिमित्ताने चव्हाट्यावर आले आहे. आणि आता अजित दादांच्या घोषणा झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनी शपथ घेतली…
त्यावेळी सत्यजित तांबे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी..
पहिले दादा अजित दादा..
दुसरे दादा सत्यजित दादा …#विधानपरिषद pic.twitter.com/w1Z8RE6bu3— Rashmi Puranik (@Marathi_Rash) February 8, 2023
Ajit Dada Satyajit Dada Slogan in Maharashtra Assembly Politics