मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता झाले आहेत. आगरकर यांनी आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. ते सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संघाशी जोडलेले होते. वेस्ट इंडिजच्या आगामी दौऱ्यासाठी टी-२० संघाची निवड करण्याची जबाबदारी मुख्य निवडकर्ता म्हणून आता आगरकर यांची असेल.
आगरकर यांनी २०२१ मध्येही मुख्य निवडकर्ता पदासाठी मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांना संधी मिळाली नव्हती. तर, चेतन शर्मा यांना निवड समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले होते. स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यानंतर भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. आता शर्मा यांच्यानंतर आगरकर यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे.