छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या 10व्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (एआयएफएफ) ला हजेरी लावली. जाजू यांनी उपस्थितांना संबोधित करताना भारताच्या चैतन्यशील आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक रचनेवर प्रकाश टाकला, तसेच देशाच्या समृद्ध कथा कथन वारशाचे प्रदर्शन करण्यात सिनेमाच्या भूमिकेवर भर दिला.
जाजू यांनी ईशान्येपासून दक्षिणेपर्यंत आणि धर्मशाळेपासून महाराष्ट्रापर्यंत, भारतभर आयोजित केल्या जात असलेल्या चित्रपट महोत्सवांच्या वाढत्या संख्येवर भाष्य केले. हे चित्रपट महोत्सव देशाचे चित्रपट, संगीत, नृत्य आणि नाटकावरील प्रेम दर्शवितात, असेही ते म्हणाले. “नाट्यशास्त्रासारख्या ग्रंथांमध्ये रुजलेला आपला कथाकथनाचा इतिहास आजच्या काळात चित्रपटाद्वारे आधुनिक अभिव्यक्ती शोधत आहे. एआयएफएफसारखे चित्रपट महोत्सव अशा सर्जनशीलतेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत हे पाहून मला आनंद होत आहे,” असेही ते म्हणाले.
10 वा अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर विभागातील चित्रपट रसिकांसाठी एक अनोखा अनुभव देत जागतिक चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. या वर्षीचा कार्यक्रम जगभरातील विविध निवडक चित्रपटांनी प्रेक्षकांना मोहित करण्याचे आश्वासन देत या प्रदेशाचे सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध करत आहे.