इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसात बॉलीवूडमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट एकामागून एक आपटले आहेत. बॉयकॉटचा वाढता ट्रेंड आणि दर्जेदार चित्रपटांची वानवा ही त्यामागची प्रमुख कारणे होती. ९ सप्टेंबर रोजी आलेल्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाने बॉलीवूडला थोडी आशा दाखवली. या चित्रपटाने दमदार सुरुवात केली आणि बॉलीवूडवरील संकट टळले असे वाटत असताना आता अजून एका चित्रपटावर बॉयकॉटचे संकट घोंघावू लागले आहे. अजय देवगण याचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र यात हिंदू देव – देवतांचा अपमान करून त्यांच्यावर विनोद करण्यात आल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.
‘थँक गॉड’ चित्रपटाचा ट्रेलर ८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या ट्रेलरसोबत अजय देवगणचा लूकही समोर आला होता. हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०२२ रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन इंद्रकुमार यांनी केले आहे. हा एक विनोदी चित्रपट आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा अपघात होतो आणि त्यानंतर चित्रगुप्ताच्या दरबारात त्याच्या कृत्यांचा हिशेब दिला जातोय असे दाखवण्यात आले आहे. अजय देवगण पडद्यावर चित्रगुप्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे.
सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. चित्रगुप्त आणि हिंदू देवतांची ज्या प्रकारे विटंबना केली जात आहे त्याचा विरोध करत असल्याचे युजर्सनी सांगितले. आता संपूर्ण बॉलिवूडवर बहिष्कार घालण्याची वेळ आली आहे, असेही अनेकांचे म्हणणे आहे. तर ‘बॉलीवूडसाठी हिंदू देव हा विनोदाचा विषय आहे का?’, असा सवालही अनेक नेटकऱ्यांनी केला आहे.
अजय देवगण भगवान चित्रगुप्त बनला आहे, ज्याच्या मागे तोकडे कपडे घातलेल्या मुली दिसत आहेत. वासना तसेच अश्लील विनोदांवर तो चर्चा करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हिंदूंचे देव विदूषक आहेत का? , एका युजरने लिहिले की, ‘आम्ही किती काळ अशा निकृष्ट अभिनयाचा आणि मनोरंजनाचा भाग होणार आहोत? असे म्हणत नेटकरी यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
Ajay Devgan New Movie Boycott Trend
Bollywood Critic