मुंबई – सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आता बच्चन कुटुंबिय असल्याची बाब समोर आली आहे. ईडीने बीग बी अमिताभ बच्चन यांची स्नुषा आणि प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला समन्स बजावले आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणात हे समन्स बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ऐश्वर्याला दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.
ईडीचे समन्स मिळताच ऐश्वर्याने ईडीकडे विनंती पत्र दिले. त्यात पुढील तारखेला हजर राहण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यास ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता तिची चौकशी नव्या तारखेला होणार असल्याचे समजते.
पनामा पेपर्स लीक प्रकरणात भारतातील ४५० हून अधिक व्यक्तींचा समावेश आहे. त्यात खासकरुन सेलिब्रेटी आहेत. त्यामुळे बॉलिवूड, खेळ, उद्योग, राजकीय अशा सर्वच क्षेत्रातील ख्यातनाम चेहऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात बच्चन कुटुंबियांचे नाव आल्याने ईडीने यापूर्वीच मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्याची चौकशी आता सुरू आहे. महिन्याभरापूर्वी अभिनेता अभिषेक बच्चन याचीही चौकशी झाली आहे. त्यानंतर आता त्याची पत्नी ऐश्वर्याला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
बच्चन यांच्यावर आरोप काय
पनामा पेपर्स लीकमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. त्यात भारतातील विविध सेलिब्रेटींनी भारत सरकारला मोठ्या प्रमाणात कर दिलेला नाही. अनेक नामांकीतांच्या परदेशात कंपन्या आहेत. त्याची माहिती त्यांनी दडवल्याचे यात समोर आले होते. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन हे सुद्धा बहामा, व्हर्जिन आयर्लंड येथील कंपन्यांचे संचालक असल्याचे त्यात नमूद होते. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या कंपन्यांची होत्या. तसेच, या कंपन्यांकडे भांडवल कुठून आले, हे सारेच प्रश्नांकीत आहे. ऐश्वर्या राय आणि तिचे आई-वडिल हे सुद्धा एका कंपनीची संचालक होते.