नवी दिल्ली – २०१६ मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनसह महाअभिनेता अमिताभ बच्चन यांचे नाव पनामा पेपर्समध्ये आले होते. त्या प्रकरणी ऐश्वर्या रॉय बच्चनला चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाकडून बोलावण्यात आले आहे. पनामा पेपर्सचे प्रकरण २०१६ रोजी उजेडात आले होते. त्यामध्ये भारतासह जगभरातील श्रीमंत नागरिकांच्या करमुक्त देशांमधील मालमत्तांची माहिती देण्यात आली होती.
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, युरोपातील आयलँड्समध्ये एमिर पार्टनर्स नावाची कंपनी उघडल्याचा ऐश्वर्यावर आरोप आहे. त्याशिवाय पती अभिषेक बच्चन याच्या परदेशातील बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने मुद्रा व्यवस्थापन अधिनियम (फेमा) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तिसर्यांदा समन्स पाठविल्यानंतर ऐश्वर्या रॉय बच्चन चौकशीसाठी हजर झाली आहे. पूर्वी दोनदा ऐश्वर्याने चौकशीसाठी न येण्याची परवानगी मागितली होती. पनामा पेपर्स प्रकरणात सासरे अमिताभ बच्चन यांचेही नाव आले होते.
पनामा पेपर्स नेमके काय आहे?
मोसाक फोन्सेका या पनामाच्या कायदेविषयक कंपनीच्या मदतीने जगातील अनेक नागरिकांनी परदेशात मालमत्ता खरेदी केल्या होत्या. त्याचा खुलासा पनामा पेपर्सने २०१६ रोजी केला होता. ज्या देशात ह्या मालमत्ता होत्या, त्यांना टॅक्स हॅवन असे म्हटले जाते. या देशांच्या कायद्यात पैसे जमा करणार्यांची ओळख लपवून ठेवण्याची तरतूद आहे. पनामा पेपर्सद्वारे कळाले की, भारतीय कायद्यांतर्गत परवानगी नसतानाही काही भारतीय नागरिकांनी मोसाक फोन्सेकाचा मदतीने आयलँड्समध्ये अनेक कंपन्या स्थापन केल्या आहेत. काहींनी परदेशातील मिळकतीवरील कर वाचविण्यासाठी टॅक्स हॅवन देशांमध्ये परदेशातून कमविलेले पैसे जमा केले. काही नागरिकांनी सरकारी ठेके किंवा गुन्हा करून कमविलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला.
पनामा पेपर्सपर्यंत कसे पोहोचले?
पनामा, आयलँड्स, बहामास, केयमेन आयलँड्स, बर्मुडा यासारख्या देशांंना टॅक्स हॅवन असे म्हटले जाते. ज्युडडॉएचे त्साइटुंग या जर्मनीच्या वृत्तपत्राला मोसाक फोन्सेकाच्या आर्थिक व्यवहाराबद्दल जवळपास २,६०० जीबी डेटा मिळाला होता. यामध्ये १९७५ पासून २०१५ पर्यंतच्या आर्थिक व्यवहाराची माहिती होती. ज्युडडॉएचे त्साइटुंग वृत्तपत्राने ही माहिती इंटरनॅशनल कॉन्सॉर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट (आयसीआयजे) या शोध पत्रकारिता करणार्या आंतरराष्ट्रीय समुहाकडे सुपूर्द केली. या समुहाने ७० देशांमधील ३७० बातमीदारांसोबत मिळून डेटाची पडताळणी केली. भारतातील इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने पनामा पेपर्सची पडताळणी केली होती. वृत्तपत्राचे पी. वैद्यनाथन अय्यर आणि जय मजुमदार हे दोन पत्रकार तपास करणार्या पथकातील सदस्य होते. दोघांनीही १ कोटी १० लाखांहून अधिक फायलींमधून भारताशी संबंधित ३६,९५७ फायलींची झडती घेतली होती.
कोणा कोणाची नावे?
पनामा पेपर्समध्ये भारतीय नागरिकांमध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय बच्चन, अजय देवगण, विनोद अदाणी, शिशिर बजौरिया, गरवारे कुटुंबीय, अपोलो ग्रुपचे अध्यक्ष ओंकार कंवर, वकील हरिश साळवे, टॅफेच्या अध्यक्षा मल्लिका श्रीनिवासन, डीएलएफचे के. पी. सिंह आणि कुटुंबीय यांची नावे होती. पनामा पेपर्सप्रमाणे आयसीआयजेने जगभरातील निवडक पत्रकारांसोबत मिळून २०२१ मध्ये पेंडोरा पेपर्सबाबतचा तपास प्रकाशित केला. त्यामध्येसुद्धा अनेक भारतीय व्यक्तींची नावे आली होती. प्राप्तीकर विभागाने कारवाई करत अशा नागरिकांना नोटीस पाठविली आहे.