विशेष प्रतिनिधी, पुणे
एअरटेल ही टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ या कंपनीशी सातत्याने स्पर्धा करत आहे. त्यामुळेच आता एअरटेलने आपल्या दोन लोकप्रिय प्री-पेड योजनांमध्ये बदल जाहीर केले आहेत. हे रिचार्ज प्लॅन ३४९ आणि २९९ रुपयांमध्ये मोबाईल ग्राहकांना मिळणार असून यात अधिक वैधता आणि अधिक डेटा दिला आहे.
नव्या योजना एअरटेलच्या अधिकृत वेबसाइटवर थेट जाहीर करण्यात आल्या आहेत. टेलिकॉम टॉकमध्ये एअरटेलच्या रिचार्ज योजनेत बदल केल्याची माहिती दिली आहे. काय आहेत एअरटेलच्या दोन नवीन योजना जाणून घेऊ या…
३४९ योजना
या प्री-पेड योजनेत ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा देण्यात आला. ही रिचार्ज योजना २८ दिवसांच्या वैधतेसह असून यापूर्वी वापरकर्त्यांना एकूण ५६ जीबी डेटा देण्यात आला होता. परंतु आता या योजनेत दररोज अडीच जीबी डेटा त्याच किंमतीत मोबाईल वापरकर्त्यांना दिला जाईल. अशा प्रकारे, एकूण ७० जीबी डेटा २८ दिवसांच्या वैधतेमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच पूर्वीपेक्षा १४ जीबी अधिक डेटा देण्यात आला आहे. उर्वरित सुविधा जुन्या योजनेप्रमाणेच असतील. म्हणजे पूर्वीप्रमाणे अमर्यादित कॉलिंगसह आपल्याला दररोज १०० एसएमएस सुविधा मिळेल. तसेच अॅमेझॉन प्राइममध्येही विनामूल्य प्रवेश असेल. मात्र ही विनामूल्य प्रवेश केवळ २८ दिवसांसाठी असेल.
२९९ योजना
ही योजना पूर्वी २८ दिवसांच्या वैधतेसह सादर केली गेली होती, ती आता ३० दिवसांच्या वैधतेसह येईल. या योजनेत अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच या योजनेत एकूण ३० जीबी डेटा देण्यात आला आहे. या योजनेत कोणतीही डेली डेटाची मर्यादा नाही. याशिवाय दररोज १०० एसएमएसची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे एक महिन्याचे विनामूल्य सबस्क्रिप्शन दिले गेले आहे. तसेच अमर्याद बदलांसह विनामूल्य हॅलो ट्यूनची सुविधा देण्यात आली आहे.