नवी दिल्ली – एअरटेल या टेलिकॉम कंपनीच्या स्टॉकमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले, त्यांच्यासाठी सोमवार, मंगळवारचा दिवस खूपच फायदेशीर ठरला. या दोन दिवसात एअरटेलचे गुंतवणूकदार मालामाल झाले. ३१ ऑगस्टला एअरटेलच्या शेअरचे भाव ६६७.९५ रुपयांच्या स्तरावर पोहोचला. गेल्या ५२ आठवड्यांमधील हा सर्वाधिक आकडा आहे. शेअर बाजाराच्या अखेरच्या सत्रात एअरटेलचे शेअर ४३.३५ रुपयांच्या गतीसह ६६३.७० रुपयांच्या भावाने बंद झाला. शेअरच्या भावामध्ये ६.९९ टक्क्यांनी वाढ झाली. सोमवारी शेअरचे भाव चढेच पाहायला मिळाले. एअरटेलचे मार्केट कॅपिटलसुद्धा ३,६४,५०५.८५ कोटी रुपयांच्या स्तरावर पोहोचला.
एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी राइट्स इश्यूच्या माध्यमातून २१ हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा नुकतीच केली. तसेच दूरसंचार उद्योगाला वाचविण्यासाठी शुल्कवाढ आणि करांमध्ये कपात करण्याबाबत वकिली केली होती. स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड कंपन्यांना पैशांची गरज असल्यास ते राइट्स इश्यू घेऊन येतात. याच्या माध्यमातून कंपनी आपल्या शेअरधारकांना अतिरिक्त शेअर खरेदी करण्याची संधी देते. कंपनीचे आधीपासूनचे गुंतवणूकदारच हे शेअर खरेदी करू शकतात.