शिर्डी – कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प असलेली येथील विमानसेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. इंडिगो कंपनीकडून येत्या १५ ऑक्टोबरपासून दोन शहरांसाठी विमानसेवा सुरू होत आहे. त्याचे बुकींग सुरू झाले आहे. शिर्डी-हैदराबाद आणि शिर्डी-नवी दिल्ली या त्या दोन सेवा आहेत. राज्य सरकारने नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरही खुले होत आहे. मंदिर खुले होताच भाविकांसाठी विमानसेवाही सुरू होत आहे. आठवड्यातील सर्व दिवस या दोन शहरांसाठी सेवा दिली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.उत्तर आणि दक्षिण भारतातील भाविकांना शिर्डीला येण्यासाठी आणि परतण्यासाठी या सेवा महत्त्वाच्या ठरणार आहेत.