नवी दिल्ली – सीमाशुल्क विभागाने दिल्ली विमानतळावरून १.२२ कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले असून, या प्रकरणात तीन संशयितांना अटक केली आहे. तिन्ही संशयित मणिपूरमधील रहिवासी आहेत.
संशयित आरोपी पोटात कॅप्सुलमध्ये सोन्याचे पेस्ट लपवून म्यानमारमधून इम्फाळला आले. देशांतर्गत विमानाने प्रवास केल्यास कोणालाही संशय येणार नाही, अशी शक्यता गृहित धरून संशयित इम्फाळमधून विमानाने दिल्लीला पोहोचले. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर सीमाशुल्क विभागाची करडी नजर असल्याने संशयितांनी नवा मार्ग निवडला होता.
सीमाशुल्क विभागाच्या माहितीनुसार, ही घटना ५ ऑगस्टला घडली. गोपनीय माहितीद्वारे इम्फाळमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तीन प्रवाशांवर विभागाला संशय आला. तपासणी केली असता त्यांच्या शरीरामध्ये कॅप्सुल आढळले. कॅप्सुलमधून ३३०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.
देशांतर्गत हवाई मार्गावर सोन्याची तस्करी करण्याच्या घटना खूपच कमी घडतात, असे सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. बहुतांश आंतरराष्ट्रीय उड्डाणात अशा प्रकारे शरीरात कॅप्सुल लपवून तस्करी केली जाते. तिन्ही आरोपींनी आधी चौकशीत सहकार्य केले नाही. मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर तिघांनी आपला गुन्हा कबूल केला. तिघांच्या पोटातून ११ कॅप्सुल जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.