इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोलकाता विमानतळावर शुक्रवारी एक धक्कादायक प्रकार घडल्याची बाब समोर आली आहे. सुमारे तासभर प्रवाशांचा श्वास रोखून धरला गेला. क्रॉसविंडमुळे संध्याकाळी ५ ते साडेसहा वाजेपर्यंत एकही विमानाचे रनवे वर लँडिंग होऊ शकले नाही. त्यामुळे तब्बल दीड तास ११ विमाने हवेतच घिरट्या घालत होती. सर्व विमानांच्या कॅप्टनने विमाने धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न केला पण नंतर वाऱ्यामुळे तो अयशस्वी ठरला. विमान धावपट्टीवरून भलतीकडेच उतरण्याचा धोका असल्याने पायलटने सावधगिरी दाखविली.
विमान उडत असलेल्या दिशेला लंबवत फिरणाऱ्या जोरदार वाऱ्यांना क्रॉसविंड म्हणतात. या वाऱ्यांमुळे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून भरकटून मोठी दुर्घटना घडू शकते. शुक्रवारी ११ विमानांनी १६ वेळा धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला. असे विचित्र हवामान पाहता सुमारे दोन डझन विमाने हवेत घिरट्या घालत राहिली. तर ९ विमाने अन्य विमानतळाकडे वळविण्यात आली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वैमानिकांनी सांगितले की, हवामान खात्याने जोरदार वाऱ्याचा इशारा जारी केला होता. परंतु अशा क्रॉसविंडचा सामना करावा लागेल, असे कुणालाही वाटले नाही. डावीकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये विमानांना धावपट्टीच्या कोनातून २० अंशांनी विचलित करण्याची ताकद होती. त्यामुळे लँडिंग खूप धोकादायक होते. या कारणास्तव, इंधन पाहता विमानांनी हवेतच राहण्याचा निर्णय घेण्यात आला.
क्रॉसविंड्स हे असामान्य नाहीत. साधारणपणे मार्च ते मे या कालावधीत क्रॉसविंडस अनभवास येतात. परंतु त्याचा प्रभाव फक्त १० मिनिटे ते अर्धा तास टिकतो. यावेळी कमी दाबाच्या क्षेत्रामुळे क्रॉसविंड झाला. त्याचा परिणाम ९० मिनिटांपर्यंत दिसून आला. त्याचा इशाराही अगोदर दिला जातो. यावेळी क्रॉसवाइंडमुळे विमाने ९० मिनिटे घिरट्या घालतील याचा अंदाज कोणालाही आला नव्हता. एका कॅप्टनच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी १६०० फूट उंचीवर ९३ किमी ताशी आणि ९०० फूट उंचीवर ८३ किमी प्रतितास वेगाने वारा वाहत होता. अशा परिस्थितीत विमान उतरवणे खूप कठीण होते. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे सर्व विमानांमधील प्रवासी अतिशय घाबरले होते. विमानतळ आले तरी तासभर ते का उतरत नाही, असा प्रश्न त्यांना पडला होता. अखेर जीव मुठीत धरुन सर्व प्रवासी जागेवरच बसून होते.
Aircraft Flight 1 Hour Waiting for Landing Airport
Kolkata Airport Crosswinds Climate Weather Passengers Air Service