नवी दिल्ली – वायू प्रदूषणामुळे आजार वाढत असून, आपले वयही घटवत आहे. वायू गुणवत्तेच्या (एक्यूएलआय) नव्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, जर भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या देशांनी वायू गुणवत्तेच्या निकषानुसार हवा स्वच्छ केल्यास आपले आयुष्य ५.६ वर्ष वाढणार आहे. नाही तर तितकेच आयुष्य कमी होईल. सर्वाधिक प्रदूषित दिल्ली आणि कोलकाता या शहरातील लोकांचे आयुष्य नऊ वर्ष कमी होऊ शकते.
एक्यूएलआयतर्फे एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार, हवा प्रदूषणातून मुक्तता मिळाल्यास जगातील सरासरी आयुष्य दोन वर्ष आणि सर्वाधिक प्रदूषित देशांमधील पाच वर्ष वाढू शकते. भारत आणि शेजारील देशांसाठी हे वय ५.६ वर्ष असेल. भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्ये जगातील एक चतुर्थांश लोक राहतात. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असेलेल्या पाच देशांमध्ये यांचा समावेश होतो.
भारतातील ४८ कोटी लोक गंगा नदीच्या मैदानी भागात राहतात. तिथे प्रदूषणाचा स्तर खूप जास्त आहे. अहवालानुसार, आता हे प्रदूषण मैदानी भागांच्याही पुढे जाऊन मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये पसरले आहे. या राज्यातील लोकांचे सरासरी आयुष्य २.५ ते २.९ वर्ष गमावू शकतात. केंद्र सरकारतर्फे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे (एनकॅप) लक्ष्य पूर्ण झाल्यास राष्ट्रीय आयुर्मान वाढून १.७ वर्षापर्यंत वाढण्यास मदत होणार आहे.
उत्तर भारत जगातील सर्वाधिक प्रदूषित
एक्यूएलआयचा अहवाल सांगतो, उत्तर भारतात प्रदूषणाच्या परिणामाची तीव्रता अंदाजापेक्षा अधिक आहे. उत्तर भारतात हवा प्रदूषणाचा स्तर सर्वात जास्त धोकादायक आहे. २०१९ सारखे प्रदूषण कायम राहिले तर या क्षेत्रात म्हणजे दिल्ली, मुंबई आणि कोलकातासारख्या महानगरातील लोकांचे आयुष्य नऊ वर्षांपेक्षा कमी होणार आहे.
प्रदूषणाचे भौगोलिक कक्षा वाढली
देशात वायूप्रदूषणाचा उच्चस्तराची भौगोलिक कक्षा रूंदावली आहे. गेल्या काही दशकांच्या तुलनेत पार्टिक्युलेट मॅटरची समस्या फक्त गंगेच्या मैदानी भागात राहिलेली नाही. महाराष्ट्र, मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये प्रदूषणाचा स्तर खूप जास्त वाढला आहे. दोन्ही राज्यात २००० वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यात २.५ ते २.९ वर्ष अतिरिक्त घट होत आहे.
सरकारे गंभीर
एक्यूएलआयचे संचालक केन ली सांगतात, वायू प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम दक्षिण आशियामध्ये झाला आहे. या भागातील सरकारे समस्येची गंभीरता लक्षात घेऊन उपाययोजना करत आहेत. स्वच्छ हवा आणि दीर्घ आयुष्य सुनिश्चित करण्याच्या दिशेने भारताचा एनकॅप आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेची गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाची स्थापना करण्यासारखे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे.