विशेष प्रतिनिधी, मुंबई
एअर इंडियासह जगातील अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स कंपन्यांवर एका मोठ्या सायबर अटॅकमध्ये 45 लाख युझर्सचा डेटा लिक झालेला आहे. पासपोर्ट, क्रेडिट कार्डसह आणखीही अनेक महत्त्वाचा डेटा यातून लिक झाल्याची माहिती आहे. एअर इंडियासह मलेशिया एअरलाईन्स, फिएनर, सिंगापूर एअरलाईन्स, लुफ्थांसा आणि कॅथे पॅसेफिक यांचा यात समावेश आहे.
एअर इंडियाने आपल्या ग्राहकांना मॅसेजद्वारे या अटॅकची माहिती दिली आहे. आपल्या SITA Pss या सर्व्हरवर अटॅक झाल्याची माहिती देतानाच ग्राहकांची खासगी माहिती स्टोअर व प्रोसेस केली जाते, असे यात सांगण्यात आले आहे.
26 आगस्ट 2011 ते 20 फेब्रुवारी 2021 या कालावधीत स्टोअर करण्यात आलेल्या डेटावर हा सायबर अटॅक झाला आहे. सायबर हल्ल्यात ग्राहकांचे नाव, जन्मतिथी, मोबाईल क्रमांक, पासपोर्टची माहिती, तिकीटांची माहिती, नियमित प्रवाशी व क्रेडिट कार्डचे डिटेल्स आदी गोष्टी लिक झाल्याचे एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
क्रेडिट कार्डचे सीव्हीव्ही आणि सीव्हीसी नंबर्स या सर्व्हरवर स्टोअर केलेले नव्हते, असे एअर इंडियाने सांगितल्यामुळे ग्राहकांच्या जीवात जीव आला आहे. परंतु, इतर माहिती लिक होणे धोकादायक असल्याने चिंता कायम आहे. दुसरी बाब म्हणजे जवळपास दहा वर्षांच्या डेटावर अटॅक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर क्राईमचे प्रकार येत्या काळात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.